स्टार प्रवाहवर दणक्यात साजरी होणार होळी

 

मुंबई:नकुशी, पुढचं पाऊल, दुहेरी, गोठ आणि आम्ही दोघे राजा राणी मालिकां मध्ये होळी साजरी
टीव्हीच्या छोट्या पडद्यावरची होळी यंदा केवळ औपचारिकता म्हणून होळी पेटवणे आणि रंगपंचमी खेळणे इतपत सीमित राहणार नसून ही होळी संस्मरणीय करण्याचे स्टार प्रवाहने ठरवले आहे. प्रवाहच्या मालिकांमधली कथानक पुढे घेऊन जाणारा होळीचा सण हे यंदाचे ठळक वैशिष्ट्य.
नीलकांती पाटेकरांनी साकारलेली बयोआजी ही व्यक्तिरेखा लोकप्रिय ठरलेली ‘गोठ’ ही मालिका कोकणातल्या पार्श्वभूमीवरची. कोकणात होळी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.त्यामुळे कोकणामध्ये ज्या पद्धतीने होळी साजरी केली जाते त्याचपद्धतीने ती गोठमध्ये दाखवली जाईल. शिमग्याच्या वेळी पालखी नाचवत प्रत्येकाच्या घरी नेणे हि कोकणामध्ये एक मोठी प्रथा मानली जाते,ही पालखी त्या ग्रामदेवतेची असते जी गावतल्या प्रत्येकाच्या घरी नाचवत नेली जाते.
गोठ मध्ये देखील अशीच ग्रामदेवतेची पालखी सालाबादप्रमाणे म्हापसेकरांच्या घरामध्ये येते. होळी हि कोकणामध्ये ५ ते १५ दिवस साजरी केली जाते त्या मध्ये संकासूरचा प्रत्येक घरोघरी जाऊन नाच हा एक आकर्षणाचा बिंदू मानला जातो.संकासूर म्हणजे एक विनोदी पात्र असते जे कोकणामध्ये घराघरात जाऊन एक आनंददायी वातावरण तयार करते.त्यामुळे ‘गोठ’ मध्ये देखील संकासूर येतो आणि म्हापसेकरांच्या वाड्यात एक नवीन चैतन्य निर्माण करून राधा विलास यांच्याबरोबर एक गमतीशीर खेळ खेळतो.
मुख्य होळीच्या आसपास काही ठिकाणी होणारी अग्नीफेऱ्याची प्रथा ही यंदा गोठ मध्ये पाहायला मिळेल.या अग्नीफेरयाच्या निमित्ताने बयोआजी राधा विरुद्ध काही षडयंत्र तर रचणार नाहीत ना याची धाकधूक प्रेक्षकांना आहे.
‘नकुशी’मधला उपेंद्र लिमये अर्थात रणजीत शिंदेच्या चाळीतली होळी यंदा आगळीवेगळी ठरणार आहे. होळीच्या दिवशी सौरभ चाळीत येतो. नकुशी,रणजीत आणि सौरभ समोरासमोर येत्तात,सोबत रणजीतचे कुटुंबीय आणि चाळकरी असतात.तेव्हा काय घडते.हा भाग उत्सुकतेचा ठरणार आहे.बग्गीवाला चाळीच्या होळीत नात्यांमधल्या गैरसमजांची होळी होईल का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अर्थात चाळीतली एकापेक्षा एक धमाल पात्रे,त्यांची होळीसमोरची गाऱ्हाणी आणि धुळवडीच्या निमित्ताने त्यांनी केलेला दंगा हे यंदाच्या नकुशीच्या होळीचे वैशिष्ट्य आहे.
मराठी टेलिव्हिजनवर सर्वस्वी नवा विषय असलेल्या उद्योगपती घराण्यातल्या अंतर्गत संघर्षाचा वेध घेणाऱ्या दुहेरी मालिकेतली होळी नात्यांच्या बहुरंगी रंगात रंगणार आहे. निवेदिता सराफ,तुषार दळवी,सुनील तावडे,अशोक शिंदे,सुपर्णा श्याम,संकेत पाठक,अमृता पवार,ज्योती जोशी,सिद्धेश प्रभाकर आणि शिल्पा नवलकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनय जुगलबंदीने यंदाची होळी दुहेरीत रंगणार आहे.
आम्ही दोघे राजाराणी मधल्या पार्थ आणि मधुराची लग्नानंतरची ही पहिली होळी. पार्थची बॉस तनुश्री आणि तिला पाठींबा देणारी पार्थची आजी यंदाच्या होळीत काय रंग उधळणार.अतरंगी लेले आणि वेंधळे नाईक कुटुंबीय कसा एकत्र कल्ला करणार,हे यंदाच्या होळीत पाहायला मिळेल.मिलिंद फाटक आणि विनय येडेकर हे कसलेले विनोदवीर यंदाच्या होळीत दे धमाल करणार आहेत.
गेली पाच वर्ष टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘पुढचे पाऊल’मध्ये अक्कासाहेबांच्या कुटुंबात कल्याणी सोबत आता तेजस्विनी आणि सायली या दोन नव्या सुना यंदाच्या होळीत सहभागी असतील.त्यात नव्या विचारांची ऑस्ट्रेलियातून आलेली सायली ही कोल्हापुरातली होळी आणि रंगपंचमीत सहभागी होईल का ? आणि तिच्या नव्या विचारांचे रंग अक्कासाहेब कसे स्वीकारतील,ही प्रेक्षकासाठी उत्सुकतेची बाब असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!