मुंबई:स्टार प्रवाह’वरील ‘गोठ’ या मालिकेतील बयोआजी, अर्थात नीलकांती पाटेकर ३ ते ६ एप्रिल या कालावधीत ‘कान्स मीप टीव्ही’ या आंतरराष्ट्रीय फिल्म बाजारमध्ये अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी फ्रान्सला गेल्या आहेत. या कानवारीमुळे बयोआजींच्या त्रासातून राधाची चार दिवस का होईना, सुटका होणार आहे.
विलासशी लग्न झाल्यापासून बयोआजीनं नेहमीच राधाला विचित्र वागवलं आहे आणि तिच्या विरोधात कारस्थानं केली आहेत. बयोआजींच्या कारस्थानांना राधा धीरानं सामोरी गेली आहे. त्यातच आता विलास आणि नीला म्हणजेच राधाची बहीण, यांच्यात नव्याने काहीतरी घडतं आहे. विलास आणि नीला जवळ येत असल्याची चाहूल राधाला लागली आहे. या सगळ्यानं राधा अस्वस्थ आहे.
आता बयोआजी ‘कान’ला गेल्या असल्यानं चार दिवसांसाठी का होईना, राधाची सुटका होणार आहे. या चार दिवसांत राधाला विलास आणि नीला यांच्यात काय घडतंय हे जाणून त्यांना थांबवण्यात यशस्वी होईल का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यासाठी ‘स्टार प्रवाह’वर रात्री ७.३० वाजता ‘गोठ’ मालिका पहायलाच हवी.
Leave a Reply