
पुणे : सरकारी वीज कंपन्यांनी राज्यातील अडीच कोटी घरगुती आणि औद्योगिक वीजग्राहकांना ऐन दिवाळीत वीज दरवाढीचा ‘शॉक’ दिला आहे. महावितरणने महागडी वीज खरेदी केल्याने इंधन समायोजन आकाराचा (एफएसी) फटका बसून, दरमहा शंभर युनिट वीज वापरणारया ग्राहकांचे वीजबिल दरमहा ६८ रुपयांनी वाढणार आहे. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत ग्राहकांना हा भुर्दंड बसणार आहे. नियमित वीज दरवाढीसंदर्भात राज्य वीज नियामक आयोगाने आदेश दिल्यानंतर लगेचच हा दरवाढीचा फटका ग्राहकांना बसला आहे. वीजबिलांमध्ये एफएसी चार्जेस हे इंधनाच्या दरावर ठरतात. यामध्ये एका मर्यादेपेक्षा अधिक एफएसी असलेल्या उत्पादकांकडून वीज घेण्यावर बंधने आणण्यात येतात. मात्र, यंदा महावितरणने या नियमांचे बंधन न पाळता महानिर्मिती कंपनीकडून महाग दराने वीजखरेदी केल्याचे समोर आले आहे. त्याचा फटका राज्यातील घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना बसला असून, येत्या डिसेंबरपर्यंत दरमहा या एफएसीपोटी प्रतियुनिट ६८ पैशांची वसुली करण्यात येणार आहे. दरमहा साडेपाचशे कोटी, म्हणजे एकूण साडेसोळाशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा त्यामुळे ग्राहकांवर पडणार आहे.मंदीचा सामना करीत असलेल्या उद्योगक्षेत्रालाही या निर्णयाचा मोठा फटका बसणार आहे.
वीजदर वाढीचा फटका; आर्थिक बजेट कोसळले
Leave a Reply