राज्यात आंतरविद्यापीठीय सुसंवाद प्रस्थापित व्हावा: डॉ. संजय देशमुख

 

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत आंतरसंवाद, सुसंवाद प्रस्थापित होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने नजीकच्या काळात प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५३व्या वर्धापन दिन समारंभ आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते.

डॉ. देशमुख म्हणाले, राज्यातील विद्यापीठांचे जागतिक विद्यापीठांशी सामंजस्य करारांच्या माध्यमातून शैक्षणिक, संशोधकीय संबंध प्रस्थापित होणे ही काळाची गरज आहेच. पण जागतिक संवाद वाढविताना स्थानिक संवाद वाढविण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. स्थानिक कृषी, अकृषी, तांत्रिक अशा सर्व प्रकारच्या विद्यापीठांच्या संवादातून शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वाऱ्यांना सामोरे जाण्याची आणि समाजाला नव्या प्रगल्भ विचारधारेच्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता विकसित होईल.चारित्र्य, मनाचा कणखरपणा व सर्व कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षणातून विकसित होते, असे सांगून डॉ. देशमुख म्हणाले, आज पारपरिक शिक्षणाबरोबरच अभिनव आणि कालानुरुप अभ्यासक्रमांच्या आखणीची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पदवी स्तरावरील शिक्षणाकडून पदव्युत्तर शिक्षणाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अवघे सात टक्के आहे. अशा विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने दूरस्थ शिक्षण पद्धतीचा उत्तम प्रकारे वापर करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे पदवी स्तरापासूनच पदविका, उच्च-पदविका आणि पदवी अभ्यासक्रम यांची लवचिक निर्मिती करून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार कौशल्यानुसार शिक्षण देण्याची पद्धती अंगिकारण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

सेवकांच्या समस्यांकडे संवेदनक्षमपणे पाहणारे नेतृत्व लाभले की तिथे संघटनेची आवश्यकता उरत नाही. असे नेतृत्व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाला लाभले आहे, असे गौरवोद्गार काढून डॉ. देशमुख म्हणाले, शिवाजी विद्यापीठाशी गेल्या तीस वर्षांपासून मी संबंधित असून साधनसुविधा, सोयींची कमतरता असतानाही इथे जे दर्जेदार संशोधन झाले आहे, होते आहे, ते स्तिमित करणारे आहे. छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची या कोल्हापूरच्या भूमीवर रुजवात झाली आणि त्यामुळेच सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाण्याची प्रेरणा भारतीय समाजात विकसित झाली. हे भारतीय समाजावर या भूमीचे मोठे ऋण आहेत.

नवीन विद्यापीठ कायद्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांच्या आशा, आकांक्षांचे प्रतिबिंब उमटविण्याची संधी लाभली आहे. जुन्यात नव्या गोष्टी मिसळून चांगलं ते प्रवाहीपणे पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी विद्यापीठामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्काराची निर्मिती करण्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे विद्यापीठातील व महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करण्यासाठी अभिनव योजनांची घोषणाही त्यांनी केली. यामध्ये १) पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबाबत आवड, जागरुकता, संस्कार व प्रवृत्ती विकसित व्हावी, यासाठी महाविद्यालयांत रिसर्च सेन्सिटायझेशन ग्रँट्स फॉर युजी स्टुडंट्स ही योजना, २) विद्यापीठात नवनियुक्त व महाविद्यालयांतील पूर्णवेळ व नियमित शिक्षकांना संशोधनात चालना मिळावी, यासाठी रिसर्च इनिसिएशन ग्रँट फॉर टिचर्स ही योजना. तसेच, ३) विद्यापीठ अधिविभागांमध्ये पूर्णवेळ व कसलीही संशोधन शिष्यवृत्ती नसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना रिसर्च स्टुडंट फायनान्शियल असिस्टन्स स्कीम ही संशोधन आर्थिक सहाय्यता निधी योजना जाहीर केली. त्याचप्रमाणे विद्यापीठ गीताची निर्मिती, सोलर एनर्जी पार्क, विज्ञान-तंत्रज्ञान पार्क, इनक्युबेशन सेंटर, संशोधक विद्यार्थी वसतिगृह, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट (वाय.सी.एस.आर.डी.)च्या स्वतंत्र इमारतीचे बांधकाम, युवा विकास केंद्र व विद्यार्थी कल्याण संचालनालय (डी.एस.डब्ल्यू.) यांचा विकास अशा काही योजना भावी काळात अंमलात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या पेमेंट गेटवे, एम्प्लॉईज कॉर्नर व कॉलेज कनेक्टीव्हीटी ॲप सेवांचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच, विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!