
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक जिल्हयात कामगारांसाठी ईएसआय रूग्णालय चालवले जाते. कोल्हापुरातही १९९७ मध्ये १० कोटी रूपये खर्च करून केंद्र सरकारने ईएसआय रूग्णालयाची इमारत बांधली. या रूग्णालयासाठी १२० कर्मचार्यांची नियुक्ती करण्याचे केंद्र सरकारने आदेश दिले. १२१० कंपन्यातील १७ हजार कर्मचार्यांना या रूग्णालयातून मोफत आणि अल्प दरात आरोग्यविषयक सुविधा मिळतील अशी आशा होती. मात्र गेल्या २० वर्षात कोल्हापुरातील ईएसआय रूग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. नव्या धोरणानुसार कोल्हापुरातील ईएसआय रूग्णालयाशी ५० हजार कुटूंबातील सुमारे अडीच लाख सदस्य या रूग्णालयाचा लाभ घेवू शकतील. या कामागारांच्या मासिक वेतनातून इएसआय रूग्णालयाच्या सुविधेसाठी काही रक्कमेची कपात केली जाते. पण गेल्या २० वर्षात कोल्हापुरातील ईएसआय रूग्णालय का सुरू होवू शकले नाही, असा थेट सवाल खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभेत उपस्थित केला. रूग्णालयाची इमारत बांधुन तयार आहे. यापूर्वी सुध्दा या विषयावर दोन वेळा लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर या विभागाचे वरिष्ठ अधिकारी मार्च २०१७ मध्ये कोल्हापूरला येवून, रूग्णालयाच्या इमारतीची पाहणी करून गेले. त्यावेळी मे २०१७ पर्यंत ईएसआय रूग्णालय सुरू केले जाईल असे त्यांनी सांगितले होते. इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्राची पुर्तता झाली नसल्याने रूग्णालय सुरू झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. अशा परिस्थितीत हजारो कामगारांच्या आरोग्याशी निगडीत शासनाचे रूग्णालय सुरू करण्यात शासनस्तरावरच अडचणी निर्माण होतात, हे खेदजनक असल्याचे खासदार महाडिक यांनी नमुद केले. आजच्या काळात शंभर कोटी रूपये मुल्यांकन असलेले ईएसआय रूग्णालय कोल्हापुरात कधी सुरू होणार, याचे नेमके उत्तर मिळावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. खासदार महाडिक यांच्या अभ्यासपूर्ण आणि महत्वाच्या प्रश्नावर कामगार आणि रोजगार राज्यमंत्री नामदार बंडारू दत्तात्रय यांनी, सविस्तर उत्तर दिले. कोल्हापुरातील ईएसआय रूग्णालय राज्य सरकारच्या अखत्यारित असून, केंद्र सरकार येत्या दोन वर्षात १०० कोटी रूपये खर्च करून नवे ईएसआय रूग्णालय येत्या दोन वर्षात उभारू आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपणासही निमंत्रीत करू असं नामदार बंडारू दत्तात्रय यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे कोल्हापुरातील ईएसआय रूग्णालय सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Leave a Reply