
कोल्हापूर:अंबाबाई मंदिरात शासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी कायदा करण्यात येणार असून हा कायदा 3 महिन्याच्या आत करणार असल्याचे विधी आणि न्यायमंत्री रणजीत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.गेले कित्येक महिने सुरु असलेल्या कोल्हापूरकरांच्या लढ्याला आज यश मिळाले.यानिमित्त आज भवानी मंडप येथे अंबाबाई पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने आज साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.अंबाबाई मंदिरात सरकारी म्हणजेच पगारी पुजारी नेमावा अशी मागणी कित्येक महिने जनांदोलनाच्या स्वरुपात सुरु होते.अंबाबाई देवीला घागरा चोळी परिधान करण्यापासून हे प्रकरण अधिकच चिघळले.पुजारी हटाव संघर्ष समितीने आंदोलनाचा रेटा उभा केला.यात डॉ.सुभाष देसाई यांनी शाहूमहाराज यांच्या वटहुकूम लोकांसमोर आणला.कित्येक वर्षे मंदिरातील पुजारी त्यांचे उत्पन्न यावर कुणाचाही अंकुश नव्हता,पुजाऱ्यांचा मनमानी कारभार सुरु होता.आता शिर्डी.पंढरपूर या धर्तीवर अंबाबाई मंदिरही पुजारी मुक्त होणार यात शंका नाही.हा अतिशय चांगला निर्णय असून लोकांचा विजय आहे,कोल्हापूरच्या परंपरेनुसार या आंदोलनालाही यश मिळाले अशी प्रतिक्रिया डॉ.सुभाष देसाई यांनी व्यक्त केली.हा जनता,पोलीस, प्रशासन,आणि लोकप्रतिनिधी यांचा विजय आहे.आता अंबाबाई मंदिरातील उत्पन्नावर अंकुश राहील आणि त्याचा उपयोग कोल्हापूरच्या विकासासाठी व्हावा असे मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मत व्यक्त केले.हे अतिशय जागृत देवस्थान आहे,देवीनेच न्याय दिला अशी प्रतिक्रिया संगीता खाडे यांनी दिली.यावेळी राजू लाटकर,शिवाजी जाधव,विजय देवणे,संजय पवार यांनी कोल्हापूरच्या जनतेला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असे सांगितले.
Leave a Reply