
कोल्हापूर: दिल्ली येथील वुई केअर फिल्म फेस्ट आणि ब्रदरहूड यांच्यावतीने विकलांगता या विषयावर लघुपटांचे आयोजन केले जाते.याच संस्थांच्यावतीने कोल्हापुरातील चेतना अपंगमती विकास संस्थेतील ८ आणि दिल्ली तसेच मुंबई येथील विकलांग संस्थेतील काही मुले आणि अमिताभ बच्चन यांचेसमवेत साईन लँग्वेजमध्ये राष्ट्रगीताची चित्रफित तयार करण्यात आली.याचे संपूर्ण चित्रीकरण मुंबई येथील राजकमल स्टुडीओ येथे झाले असून अमिताभ बच्चन सोबत अश्या प्रकारची चित्रफित चित्रित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.या चित्रीफितीचा अनावरण समारंभ नवी दिल्ली येथे मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते १० तारखेला होणार असून कोल्हापुरात हा समारंभ १३ ऑगस्ट रोजी रविवारी सकाळी १० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि महापौर हसीना फरास यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती चेतनाचे कार्याध्यक्ष पवन खेबुडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.एकूण ३६ मुले या राष्ट्रगीतामध्ये असून यातील चेतनाच्या ८ मुलांचा समावेश आहे.ही कोल्हापूरसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे असे अध्यक्ष नरेश बगरे यांनी सांगितले.चेतनाच्या मुलांसाठी ही अतिशय मोठी गोष्ट होती.अमिताभ सारख्या सुपरस्टार समवेत राष्ट्रगीत चित्रित करण्याचे भाग्य चेतनातील मुलांना मिळाले आहे.भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून दिल्ली,भोपाळ.मुंबई आणि कोल्हापुरात या चित्रफितीचे अनावरण होत आहे.याचे स्वागत मोठ्या प्रमाणात होईल असे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला कोषाध्यक्ष श्रीराम भिसे यांच्यसह चेतनाचे संचालक उपस्थित होते.
Leave a Reply