कोल्हापूर : दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 18.95 टक्के इतका लागला असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के इतका लागला असून कोल्हापूर जिल्ह्याने विभागीय मंडळात प्रथम क्रमांक पटकावला असल्याची अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाच्या प्रभारी अध्यक्षा पुष्पलता पवार यांनी पत्रकार बैठकीत दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 18 जुलै ते 2 ऑगस्ट 2017 या कालावधीत दहावीची फेर परीक्षा घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑन लाइन जाहीर करण्यात आला. या फेरपरीक्षेसाठी कोल्हापूर विभागात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन्ही जिल्ह्यातून 8 हजार 355 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 8 हजार 325 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यांपैकी 1 हजार 578 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत कोल्हापूर विभागाचा निकाल 18.95 टक्के इतका लागला असून कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 24.61 टक्के इतका लागला आहे. विभागीय मंडळात कोल्हापूर जिल्ह्यानं अव्वल क्रमांक पटकावलाय तर सांगली जिल्ह्याचा निकाल 18.47 टक्के लागला असून विभागात दुसरा क्रमांक पटकावलाय. सातारा जिल्ह्याचा निकाल 13.86 टक्के लागला असून सातारा जिल्हा विभागीय मंडळात तिसऱ्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत मुलांच्या उर्तीणतेचे प्रमाण 18.47 टक्के इतके आहे, तर मुलींच्या उर्तीर्णतेची टक्केवारी 20.43 टक्के इतके आहे, मुलींचे उर्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 1.96 टक्यांनी जास्त आहे. नियमीत परीक्षेबरोबरच फेरपरीक्षेतही मुलींनीच बाजी मारली आहे. गतवर्षी पेक्षा यंदाच्या निकालात 2.38 टक्यांनी घट झाली आहे. या निकालाच्या गुणांची ऑन लाइन प्रत विभागीय मंडळाच्या संकेतस्थळावरून काढता येणार आहे. मंडळाने राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. यंदा एकही कॉपी प्रकरण आढळून आले नाही.
गुणपडताळणीची मुदत 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत असून विहित नमुन्यातील अर्जासोबत संकेतस्थळावरील स्वसाक्षांकित गुणपत्रिकेची प्रत जोडून विहित शुल्कासह विभागीय मंडळाकडे अर्ज सादर करावेत तसेच उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतसाठी 30 ऑगस्ट ते 18 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्याची माहितीही प्रभारी अध्यक्षा पुष्पलता पवार यांनी दिली. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी, माध्यमिक शिक्षण अधिकारी देविदास पुलाल, विस्तार अधिकारी माधुरी गुरव, एस एल रेणके उपस्थित होते.
Leave a Reply