
कोल्हापूर: समाजासाठी योग्य भूमिका घेवून आणि सामाजिक बांधिलकीचं भान राखून भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून राबवलेला मोफत हेल्मेट वाटपचा उपक्रम दिशादर्शक आणि आदर्शवत आहे. सवंग लोकप्रियतेसाठी अनाठायी विरोध करण्याऐवजी, समाजासाठी उपयुक्त असलेल्या विषयांना हात घालत, स्वखर्चानं काम करण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं. भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं आज महिलांसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलं. त्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. हेल्मेट वापराबाबत प्रबोधन आणि जनजागृती करण्याबरोबरच दुचाकी परवाना देतानाच हेल्मेट सक्ती करावी, असं मत खासदार महाडिक यांनी व्यक्त केलं. तर विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही पोलीस प्रशासनाच्या भूमिकेला पूरक अशी भूमिका भागीरथी संस्थेनं घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.
महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी, कला-क्रीडा गुणांना व्यासपीठ देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याच्या पुढं जावून, भागीरथी संस्थेनं युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले आणि आता महिला सभासदांसाठी मोफत हेल्मेट वाटप करण्याचा उपक्रम हाती घेतलाय. आज कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं भागीरथी संस्थेच्यावतीनं महिलांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते, डॉ. संतोष प्रभू यांच्या हस्ते दिपप्रज्वलनानं झालं. प्रारंभी सौ. महाडिक यांनी तुळशीचं रोपटं देवून मान्यवरांचं स्वागत केलं. तत्पूर्वी मिशन हेल्मेट या पथनाट्याद्वारे हेल्मेटचा वापर किती महत्वाचा आहे, यावर प्रबोधन करण्यात आलं. रस्त्यावरील अपघात, त्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आणि हेल्मेट वापराचा फायदा याबद्दल प्रभावीपणे मांडणी करण्यात आली. डॉ. संतोष प्रभू यांनी, अपघाताच्या आकडेवारीसह हेल्मेटची गरज विषद केली. तसंच मेंदूला झालेल्या दुखापतीमुळं झालेले मृत्यू आणि आयुष्यभरासाठी आलेलं अपंगत्व याबाबत माहिती दिली. खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भारत वगळता संपूर्ण जगभरात हेल्मेट वापरलं जातं. परदेशात अगदी सायकल वापरतानाही हेल्मेट परिधान केलं जातं. पण आपल्याकडं हेल्मेट गैरसोयीचं वाटतं. वास्तविक हेल्मेट जीवरक्षक साधन असून, त्यासाठीच भागीरथी संस्थेनं मोफत हेल्मेट वाटप उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितलं. हेल्मेट वाटप करुन संस्थेची जबाबदारी संपली नाही, तर ज्यांनी हेल्मेट घेतली आहेत, ते दररोज त्याचा वापर करतात का, याचा पाठपुरावा करण्याची सूचना खासदार महाडिक यांनी केली. तसंच प्रत्येक स्त्रीनं आपल्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी हेल्मेट वापराला पाठिंबा द्यावा, तरच समाजात हेल्मेट वापराविषयी सकारात्मक भूमिका निर्माण होईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच दुचाकी वाहन परवाना देतानाच हेल्मेट सक्ती करावी, अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली. प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार म्हणाले, कुटुंब महिलेवर अवलंबून असतं. म्हणूनच तिची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे. त्या दृष्टीकोनातून भागीरथी संस्थेनं उचललेलं पाऊल क्रांतीकारी आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीही भागीरथी संस्थेच्या भूमिकेचं कौतुक करुन, महिलांचं स्वावलंबन, स्वसंरक्षण आणि छेडछाडविरोधी धडे देण्याचा संस्थेचा उपक्रम महत्वाचा असल्याचं नमूद केलं. जिल्ह्यात हेल्मेट सक्तीला जोरदार विरोध झाला. पण समाजाच्या हितासाठीच हेल्मेट वापराचा उपक्रम भागीरथी संस्थेनं सुरु केल्याबद्दल नांगरे-पाटील यांनी समाधान व्यक्त केलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सवंग लोकप्रियतेसाठी भूमिका घेण्याऐवजी, समाजाला उपयुक्त काय आणि त्यासाठी योग्य काय, याचा सारासार विचार करुन खासदार धनंजय महाडिक आणि सौ. अरुंधती महाडिक यांनी राबवलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. स्वखर्चातून हा प्रबोधनात्मक उपक्रम राबवल्याबद्दल महाडिक दांपत्याचं विशेष अभिनंदन करत असल्याचंही पालकमंत्र्यांनी सांगितलं. हेल्मेट म्हणजे अनावश्यक ओझं नसून, जीवरक्षक साधन आहे, असं मतही नामदार पाटील यांनी व्यक्त केलं. त्यानंतर प्रातिनिधीक स्वरुपात महिलांना हेल्मेट वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, पी. डी. सावंत, नगरसेविका स्मिता माने, रुपाराणी निकम, अश्विनी बारामते, मनिषा कुंभार, उमा इंगळे, सीमा कदम, सविता शिंदे, संगीता खाडे, कविता माने, अर्चना पागर, जयश्री जाधव, सुनंदा मोहिते, गीता गुरव, अर्चना मगदूम, अवनी शेठ, पद्मा शिंदे, उत्कर्षा पाटील, दिलशाद मुजावर यांच्यासह मान्यवर आणि महिला सभासद उपस्थित होत्या.
Leave a Reply