पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी स्पर्धेचे १६ सप्टेंबर रोजी आयोजन:सौ.अरूंधती महाडिक यांची माहिती

 

कोल्हापूर: धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने दरवर्षी भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन केले जाते. या वर्षी शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी, मार्केट यार्डमधील रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं झिम्मा – फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धेसाठी तब्बल ५ लाख रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्था, गेल्या ७ वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करते. खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा प्रचंड यशस्वी आणि लोकप्रिय बनली आहे. स्पर्धेला प्रत्येक वर्षी महिला भगिनींचा प्रतिसाद वाढत आहे. गेल्या वर्षी सुमारे १२ हजार महिलांनी झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. झिम्मा, घागर घुमविणे, उखाणे, सूप नाचविणे, काटवट काणा, छुई फुई, जात्यावरील ओव्या, फुगडी, घोडा घोडा, पारंपारिक वेशभूषा अशा गटांमध्ये ही स्पर्धा होत असून, यंदा १५ हजारांहून अधिक महिला -युवती या स्पर्धेत सहभाग घेतील, अशी अपेक्षा आहे. चुल आणि मुल या चक्रातून बाहेर पडून, महिलांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि मराठी संस्कृतीचं जतन व्हावं, यादृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय या स्पर्धेतून महिलांच्या आरोग्यालाही चालना मिळते. त्याचबरोबर सांघिक भावना आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होत असल्यामुळे, जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असा भागीरथी महिला संस्थेचा प्रयत्न असतो. त्याला जिल्हयातील शहरी आणि ग्रामीण भागातील हजारो महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो. यावर्षी १६ सप्टेंबर रोजी होणार्या झिम्मा फुगडी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, भागीरथीच्या पदाधिकारी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. महालक्ष्मी सुरेश मसाले, अर्जुन ऑईल हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीने संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, असे सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला भागीरथीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!