

निर्माते मिहीर शाह यांची निर्मिती असलेल्या ‘कृतांत’ या चित्रपटाची निर्मिती रेनरोज फिल्म्सच्या बेनरखाली करण्यात येत आहे. जगभरामध्ये मोटिव्हेशनल ट्रेनर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिहीर शाह यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. दत्ता मोहन भंडारे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून यापूर्वा अनेक यशस्वी चित्रपटांच्या बांधणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत.नुकताच गीतध्वनीमुद्रणाने ‘कृतांत’ या चित्रपटाचा मुहूर्त जुहू येथील आजीवासन या स्टुडिओमध्ये करण्यात आला. दरम्यान चित्रपटामधील “तू आणि मी मौनातले बोलणे…’’ हे मुहूर्ताचं गाणं ऋषीकेश रानडे यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं. या प्रसंगी चित्रपटातील कलाकार, गायक, संगीतकार, तंत्रज्ञ यांच्या जोडीला मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळीही उपस्थित होती.
“तू आणि मी मौनातले बोलणे…’’ असे बोल असलेलं ‘कृतांत’ मधील मुहूर्ताचं गाणं गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून आकाराला आलं आहे. संगीतकार विजय गवंडे यांनी या गीताला संगीत दिलं आहे. हे गाणं चित्रपटाच्या कथेत महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. या चित्रपटाचा विषय आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनाशी अनायसे जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करणारा आहे.
दिग्दर्शनासोबतच कथा, पटकथा आणि संवादलेखनाची जबाबदारीही दत्ता मोहन भंडारे यांनी पार पाडली आहे. आशयघन कथानकाला तितक्याच ताकदीच्या कलावंतांच्या मदतीने न्याय देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. त्यासाठी त्यांनी संदिप कुलकर्णा, सुयोग गो-हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आदी कलाकारांची निवड केली आहे. आजच्या काळात प्रत्येक जण धावपळ करण्यात इतका गुंग झालाय की त्याला अंतर्मनात डोकावायलाही उसंत नाही. ‘कृतांत’ हा चित्रपट त्यांना स्वतःकडे आणि त्या अनुषंगाने आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्याच व्यक्तीकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा असल्याचं दिग्दर्शक दत्ता भंडारे मानतात.
विजय मिश्रा या चित्रपटाचे व केमेरामन आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या वेशभूषेची जबाबदारी प्राची पाटील यांची असून रंगभूषा व्यंकटराम वरंगटी करीत आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करण्याची योजना निर्माता-दिग्दर्शकांनी आखली असून यासाठी महाराष्ट्रातील नयनरम्य लोकेशन्सची निवड करण्यात आली आहे.
Leave a Reply