‘स्वराज्यरक्षक संभाजी’ २४ सप्टेंबरपासुन झी मराठीवर

 

छत्रपती संभाजी महाराज. हिंदवी स्वराज्याचे पहिलेअभिषिक्त युवराज आणि दुसरे अभिषिक्त छत्रपती. परंतु जणू वाद आणि गैरसमज त्यांच्या पाचवीलाच पुजलेले होते. कारण नियती प्रत्येक पावलावर त्यांची परीक्षा घेत होती. एकीकडे कर्तृत्व आणि शौर्य गाजवत असताना दुसरीकडे स्वकीयांकडूनच होणारे वारही झेलत होते. यवनांचं आक्रमण आणि स्वकियांची बंडाळी या सर्वांना हा राजा पुरुन उरला खरा पण त्याची दखल इतिहासाने हवी तशी घेतली नाही याची रुखरुख आजही अनेकजण बोलून दाखवतात. काय होता हा या राजाचा इतिहास ? इतिहासाच्या पानात काय दडलंय ?याच प्रश्नाचा धांडोळा घेतला जाणार आहे झी मराठीवर नव्याने दाखल होणा-या स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेद्वारे. येत्या २४ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता दोन तासांच्या विशेष भागाने या मालिकेचा भव्य शुभारंभ होणार आहे. तर २५ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वा. ही मालिका झी मराठीसह झी मराठी एचडी वर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका कोण करणार याबद्दल कमालीची उत्सुकता होती. राजांचं हे रुप कसं असेल कोणता कलाकार ही भूमिका साकारेल हे सांगण्यासाठी एका शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अतिशय दिमाखदार पद्धतीने वाजत गाजत या रुपाचं प्रथम दर्शन दाखवण्यात आलं ज्यात डॉ. अमोल कोल्हे हे संभाजीराजांचं रुप घेऊन उपस्थितांसमोर अवतरले. या भूमिकेबद्दल बोलतांना डॉ. कोल्हे म्हणाले की, “गेल्या अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं स्वप्न आज पूर्ण होत आहे याचा विशेष आनंद आहे. ज्या राजाने आपल्या कर्तृत्वाने औरंगजेबासारख्या शहेनशहाला मात दिली, ९ वर्षांच्या कारकिर्दीत लढलेल्या सर्व लढाया ज्याने जिंकल्या अशा अजेय राजाची महती अजूनही आपल्यापर्यंत हवी तशी पोचली नाहीये. ही मालिका म्हणजे त्याच राजाचा देदीप्यमान इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!