
कोल्हापूर: शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी रामकृष्ण लॉन येथे, भागीरथी महिला संस्थेच्यावतीने झिम्मा फुगडीसह महिलांच्या पारंपारिक खेळांचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी या स्पर्धेला युवती-महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. झिम्मा, फुगडी, काटवट काणा, उखाणे, सूप नाचवणे, घागर घुमवणे अशा पारंपारिक लोककलांना यानिमित्ताने प्रोत्साहन मिळते आणि महिलांनाही रोजच्या धावपळ, दगदगीतून सुटका मिळत, अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन करता येते. त्यामुळेच भागीरथी महिला संस्थेच्यावतीने आयोजित पारंपारिक खेळांच्या स्पर्धांना दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी होणार्या स्पर्धेला कोल्हापुरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेतच, पण रुपेरी पडद्यावरील अनेक नामवंत कलाकार भागीरथीच्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत. झी मराठी वाहिनीवरील, तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात स्थान मिळवलेला राणा म्हणजेच हार्दिक जोशी, अंजलीच्या भूमिका करणार्या अक्षया देवधर ही जोडी उपस्थित राहणार आहे. तर स्टार प्रवाह वाहिनीवरील दुहेरी या कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ म्हणजेच सुहासिनी, सोनियाची भूमिका करणार्या सुपर्णा शाम आणि दुष्यंतची भूमिका करणारा संकेत पाठक उपस्थित राहणार आहेत. झिम्मा फुगडी स्पर्धेत सहभागी युवती-महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे लोकप्रिय कलाकार आवर्जून कोल्हापुरात येत आहेत.
Leave a Reply