
कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिरातील श्रीपूजक हटावून शासनाने पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून जनआंदोलन सुरु आहे. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये झालेल्या घोटाळया संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नाद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी या संदर्भात १५ दिवसात बैठक घेण्याची ग्वाही, विधी व न्याय राज्यमंत्री नाम. रणजीत पाटील यांनी दिली होती. त्यानुसार मुंबई येथे विधी व न्याय राज्यमंत्री नाम. रणजीत पाटील यांच्या दालनामध्ये बैठक पार पडली. या बैठकीस महसूल मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील आणि आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये येत्या अधिवेशनापूर्वी श्री अंबाबाई मंदिरात शासनाचे पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यात येणार असल्याचे विधी व न्याय राज्यमंत्री नाम. रणजीत पाटील यांनी दिली. या पार्श्वभूमीवर आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना शहर कार्यालय येथे श्री अंबाबाई मंदिर समन्वय समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, श्री अंबाबाई मंदिराबाबत सुरु असलेले विषय कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे विषय असून, करवीर निवासिनी श्री अंबाबाई चे सुरु असलेले लक्ष्मी नामकरण थांबवून रुढीप्रमाणे श्री अंबाबाई नाव प्रचलित करावे, यासह मंदिराचा पवित्रता भंग करणारे आणि भाविकांची लुट करणारे वारसदार पुजारी हटवून, पंढरपूर, शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर शासनाने सुशिक्षित पगारी पुजारी नेमावेत, यासाठी जनआंदोलन उभारण्यात आले आहे. जनतेच्या भावना तीव्र असून आगामी नवरात्र उत्सव काळामध्ये कोणतेही गालबोट लागू नये या दृष्टीने येत्या अधिवेशनापूर्वी शासनाने पंढरपूरच्या धर्तीवर पगारी पुजारी नेमण्याचा कायदा करण्याबाबत आपण ठाम भूमिका मांडली असून, पगारी पुजारी नेमण्याबाबत कायदा करण्यास आपण शासनास भाग पाडू, असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. यासह शिर्डी, पंढरपूर, सिद्धिविनायक मंदिरांच्या धर्तीवर नेमलेल्या पुजार्यांना असलेल्या पगाराच्या अनुषंगाने याही पुजार्याना पगार द्यावेत, पुजार्यांचा कोणताही लाडकपणा शासनाने करू नये, ज्या पुजार्यांमुळे हा वाद निर्माण झाला त्या पुजार्याना मंदिरातून कायमस्वरूपी हद्दपार करावे, त्यांचे कोणतेही लांगूलचालन खपवून घेतले जाणार नसल्याचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
Leave a Reply