
कोल्हापूर: मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ यंदा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. देवानंद शिंदे यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल येत्या रविवारी (दि. १७) सायंकाळी ६ वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे डॉ. शिंदे यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.मराठवाडा समन्वय समितीतर्फे दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीदिन महोत्सव साजरा करण्यात येतो. या निमित्ताने विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी बजावून मराठवाड्याच्या लौकिक सर्वदूर करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. या वर्षी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गुत्ते, लेखक डॉ. शमशुद्दीन तांबोळी, उद्योजक ओमप्रकाश पेठे आणि प्रगतशील शेतकरी ईश्वरदास घनघाव यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बी.व्ही.जी. इंडिया कंपनीचे संस्थापक व चेअरमन हनुमंतराव गायकवाड उपस्थित राहणार असून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या प्रसंगी ‘वैभवशाली मराठवाडा २०१७’ या वार्षिक विशेषांकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
Leave a Reply