१० हजाराहून अधिक महिलांच्या उदंड प्रतिसादात रंगल्या झिम्मा फुगडी स्पर्धा

 

कोल्हापूर:  पारंपारिक गीतांच्या तालावर धरलेला फेर, प्रोत्साहनासाठी टाळ्यांचा गजर आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा जागर, अशा उत्साही वातावरणात आज महिलांनी दिलखुलास कलाविष्कार सादर केला. निमित्त होतं, भागीरथी महिला संस्थेनं आयोजित केलेल्या पारंपारिक लोककला स्पर्धेचं ! तब्बल १० हजार महिलांच्या मांदियाळीतून आज दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेमुळं, महाराष्ट्राच्या गौरवशाली लोककलेला आणि स्त्रीयांच्या कलाविष्काराला बहर आला. याच कार्यक्रमात भागीरथी महिला संस्थेच्या नव्या गीताचं अनावरण झालं. झिम्मा-फुगडी स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील हजारो महिला एकत्र येतात आणि रोजचे ताणतणाव विसरून पारंपरिक खेळांचा आनंद लुटतात. चॅनल बी च्या थेट प्रक्षेपणाद्वारे लाखो दर्शकांनी झिम्मा फुगडीचा आनंद घरबसल्या घेतला.
चूल आणि मूल किंवा नोकरी व्यवसायाच्या चक्रात अडकलेल्या महिलांचा एक दिवस आनंदानं आणि उत्स्फुर्त कलाविष्कारानं रंगावा आणि महाराष्ट्राची लोककला जीवंत रहावी, यासाठी धनंजय महाडिक युवाशक्ती महिला आघाडी प्रेरित, भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं, दरवर्षी पारंपारिक लोककला स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद वाढतो आहे. यंदा सुमारे १० हजार महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेवून प्रचंड प्रतिसाद दिला. आज सकाळी १० वाजल्यापासून मार्केट यार्ड जवळील रामकृष्ण मल्टिपर्पज हॉलकडं महिलांची पावलं वळत होती. नटूनथटून, केसात गजरा माळून, कोल्हापुरी साज- नथ- बिंदी अशा आभूषणांनी सजून, नऊवारी साडीत आलेल्या शेकडो महिलांनी रामकृष्ण मल्टिपर्पज हॉलचा परिसर गजबजून गेला होता. सकाळी अकराच्या सुमारास या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सौे. रूपाली नांगरे-पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, महापौर हसिना फरास, डॉ. अनुश्री चौधरी, सौ. प्रकृती निगम-खेमनार, सौ. भारती संजय मोहिते, पेठ वडगावच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रविता सालपे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. निता माने, इचलकरंजीच्या नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी बोलताना सौ. अरूंधती महाडिक यांनी, स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल महिलांना धन्यवाद दिले. महिलांचं आरोग्य चांगलं रहावं, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणी पारंपरिक खेळांचं जतन व्हावं, या उद्देशानं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या झिम्मा-फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं सौ. महाडिक यांनी सांगितलं. तसंच पुढच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मोठ्या संख्येनं झिम्मा-फुगडी स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या उद्देशानं ११ हजार महिलांचा झिम्मा-फुगडी उपक्रम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
सौ. रूपाली नांगरे-पाटील यांनी या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक केलं. डॉ. सौ. अनुश्री चौधरी यांनी परंपरा जतन करतानाच महिलांची आर्थिक उन्नती करण्याचं कार्य सौ. अरुंधती महाडिक यांनी केलं असल्याचं सांगितलं. प्रकृती निगम-खेमनार यांनी इतक्या मोठ्या संख्येनं प्रथमच महिला एकत्र आल्याचं पाहून मनाला आनंद वाटतो. सौ. अरुंधती महाडिक यांनी अशा प्रकारचे उपक्रम निरंतर सुरू ठेवावेत, असं सांगितलं. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी महाडिक कुटुंबीयांनी जिल्ह्यातील अनेकांना मदतीचा हात दिलाय. सौ. अरुंधती महाडिक यांनी सामाजिक भान ठेवून राबवलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. वडगावच्या उपनगराध्यक्षा प्रविता सालपे यांनी महाडिक कुटुंबीयांच्या दातृत्वाचं कौतुक केलं. इचलकरंजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी सौ. अरुंधती महाडिक यांचं कौतुक करताना स्वतःचा संसार सांभाळत समाजभान जपण्याचं मोठं कार्य केल्याचं सांगितलं. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी अनेक स्त्रियांच्या यशामध्ये पुरुषांचाही वाटा असतो. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कुटुंबीयांसोबत जिल्ह्यातील अनेकांना शक्ती दिली असल्याचं सांगून सौ. अरुंधती महाडिक यांच्या कार्याचं कौतुक केलं. महापौर हसीना फरास यांनी भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचा गौरव केला. यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या नव्या गीताचं अनावरण करण्यात आलं. स्पर्धा स्थळी खासदार धनंजय महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक यांनी भेट देवून, स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं. खासदार धनंजय महाडिक यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. विविध विभागात स्पर्धा घेण्यात आल्या. झिम्मा- फुगडी, काटवटकाणा, उखाणे, छुई फुई, घागर घुमविणे, सुप नाचविणे अशा विविध पारंपारिक लोककला आणि खेळांमध्ये महिला वर्ग दंग झाला. प्रेक्षक महिलांकडून मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद, संगीताची धून आणि पारंपारिक गीतं अशा वातावरणात स्पर्धेला रंग भरला. कोल्हापुरी फेटे, भगव्या टोप्या परिधान करुन आलेल्या आणि आपल्या सादरीकरणातून समाजप्रबोधनात्मक संदेश देणार्या पारंपारिक लोककलांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. प्रचंड गर्दीत पण तरीही नेटक्या संयोजनामुळं शिस्तबद्धरित्या आणि अपूर्व उत्साहात आणि जल्लोषात ही स्पर्धा पार पडली. अशाप्रकारचा उपक्रम आयोजित करुन, महिलांना एक दिवस आनंददायी आणि चैतन्यानं भारलेला दिवस अनुभवण्याचं समाधान दिल्याबद्दल, भागीरथी महिला संस्था आणि महाडिक कुटुंबियांबद्दल अनेक महिलांनी गौरवोद्गार काढले. रामकृष्ण मल्टिपर्पज हॉलमध्ये या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला सहजसेवा ट्रस्ट संस्थेच्यावतीनं मोफत जेवण देण्यात आलं. संस्थेचे अध्यक्ष सन्मती मिरजे, प्रमोद पाटील यांनी त्यासाठी परिश्रम घेतले. वाहनांसाठी स्वतंत्र पार्कींग व्यवस्था, नोंदणीची व्यवस्था, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक स्पर्धेच्या ठिकाणी तैनात होतं. या स्पर्धेसाठी एकूण ५ लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली होती. याशिवाय स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आलं. लहान-थोर अनेक महिलांनी पारंपारिक वेशभूषा आणि साजशृंगार करून, विविध खेळांमध्ये दिलखुलासपणे भाग घेतला. अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेक वाचवा, झाडे लावा, प्रदुषण टाळा असे सामाजिक संदेश दिले. महालक्ष्मी सुरेश मसाले, अर्जुन ऑईल हे या स्पर्धेचे प्रायोजक होते. या स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा, यासाठी चॅनल बी च्यावतीनं संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं. त्याचाही लाभ अनेकांनी घरबसल्या घेतला. रात्री उशिरा स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!