
कोल्हापूर: गेल्या काही दिवसात केंद्र शासनाने पेट्रोल, डीझेल, गॅस सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीमुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, दरवाढीबाबत जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना “अच्छे दिन” देण्याचे आश्वासन दिले होते. पण, सध्याच्या परिस्थितीवरून अच्छे दिन तर लांब सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. केंद्र शासनाने केलेली दरवाढ जनतेची लुट करणारी असून, ही दरवाढ रद्द करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना देशव्यापी आंदोलन उभे करेल, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला आहे. पेट्रोल, डीझेल, गॅस सह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये केलेल्या भरमसाठ दरवाढीबाबत आज शहर शिवसेनेच्या वतीने खानविलकर पेट्रोल पंप येथे निदर्शने करण्यात आली.
आज सकाळी खानविलकर पेट्रोल पंप येथे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक जमले. यामध्ये महिलांचा सहभाग अधिक होता. यावेळी “महागाई- दरवाढीचा राक्षस सर्वसामान्य नागरिकाच्या गळ्यावर सुरी फिरवत असल्याचा प्रतीकात्मक देखावा करण्यात आला होता. तर महिलांनी सिलेंडरची टाकी हातात घेऊन दरवाढीचा निषेध केला. यावेळी “दरवाढ करणाऱ्या केंद्र शासनाचा धिक्कार असो”, “दरवाढ कमी झालीच पाहिजे”, अशा घोषणानी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकालामध्ये कच्च्या तेलाची किंमत बॅरेल मागे ११० रुपये होती. त्यावेळी ६० ते ६५ रुपयात पेट्रोल मिळत होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कच्च्या तेलाची किंमत बॅरेल मागे ५० रुपये म्हणजे जवळपास ६० टक्के इतकी कमी झाली असतानाही पेट्रोल ८० रुपये प्रतीलिटर विकले जात आहे. ही केंद्र शासनाकडून जनतेची लुट सुरु आहे. विकासाच्या नावाखाली वेगवेगळे प्रकल्प राबवून श्रीमंताला श्रीमंत आणि गरिबाला अजून गरीब करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. आज देशातील सर्वसामान्य, गरीब माणसांचे जगणे मुश्कील झाले असताना मेट्रो सारखे प्रकल्प राज्यावर लादले जात आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल किंवा सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यापेक्षा अधिक वाढत आहेत. सत्तेपूर्वीचे मोदी आणि सत्तेनंतरचे मोदी यात बदल दिसून येत असून, आश्वासनाची खैरात करून सर्वसामान्य जनतेस खुळे करण्याचे स्वप्न रंगविले जात आहे. परंतु, जनतेच्या होणाऱ्या लुटीला शिवसेना कायम विरोध करीत आली असून, केंद्र शासनाने ही दरवाढ मागे घेतली नाही, तर आगामी काळात शिवसेना तीव्र आंदोलन उभे करेल असा इशाराही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेनेचे माजी उपमहापौर उदय पवार, दीपक गौड, माथाडी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश सरनाईक, शहरप्रमुख राज जाधव, उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रमेश खाडे तुकाराम साळोखे, सुनील जाधव, रणजीत जाधव, अजित गायकवाड, सुनील खोत, किशोर घाटगे, सागर घोरपडे, विशाल देवकुळे, अनिल पाटील, निलेश हंकारे, निलेश गायकवाड, दीपक चव्हाण, छोटू जिरगे, राहुल चव्हाण, उमेश जाधव, कमलाकर किलकिले, सचिन भोळे, अभिजित गजगेश्वर, रणजीत मंडलिक, राहुल माळी, अमोल बुढ्ढे, मुकुंद मोकाशी, राजू काझी, महिला आघाडी शहरप्रमुख मंगल साळोखे, पूजा भोर, गौरी माळदकर, पूजा कामते, रुपाली कवाळे, गीता भंडारी आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply