झी मराठी दिवाळी अंकाला वाचकांचा भरभरुन प्रतिसाद

 

मराठी मनोरंजनाच्या क्षेत्रात आपल्या प्रेक्षकांना सतत काही तरी नवीन अनुभव देणा-या झी मराठी वाहिनीने आजवर अनेकविध उपक्रमांद्वारे प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. यावर्षी झी मराठीने पहिल्यांदाच आपला दिवाळी अंक उत्सव नात्यांचा बाजारात आणला. एखाद्या मनोरंजन वाहिनीने दिवाळी अंक प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ . झी मराठी वाहिनीने नुकतीच अठरा वर्षे पूर्ण केली. या अठरा वर्षांच्या काळात झी मराठी वाहिनीसोबत अनेकांचे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. कलाकार असो की प्रेक्षक प्रत्येकजण या वाहिनीशी जोडला गेलेला आहे. याच नात्याला केंद्रस्थानी ठेवून उत्सव नात्यांचा हा दिवाळी अंक काढण्याची संकल्पना झी मराठी वाहिनीला सुचली आणि त्यांनी हा अंक बाजारात आणला आणि वाचकांनी त्याला भरभरुन प्रतिसाद दिला. ग्रंथाली प्रकाशनाच्या वतीने आणि अक्षरधारा तथा बुकगंगाच्या साह्याने वितरीत करण्यात आलेल्या या अंकाची पहिली आवृत्ती अवघ्या तीन दिवसांत संपली आहे. अनेक ठिकाणी वाचकांना अंक उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या पदरी पडणारी निराशा टाळण्यासाठी आता झी मराठी वाहिनीने या अंकाची दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसांत हा अंक बाजारात उपलब्ध होणार असून छोट्या छोट्या शहरांत आणि गावांत तो कसा वितरीत करता येईल यासाठी वाहिनी प्रयत्नशील असणार आहे.

झी मराठीच्या पहिल्या दिवाळी अंकाची घोषणा झाल्यापासूनच या अंकात काय वाचायला मिळेल याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता होती. ‘नक्षत्रांचे देणे’या कार्यक्रमात या दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्यानंतर आठवड्याभरातच हा अंक बाजारात आला. ९ ऑक्टोबरपासून हा अंक उपलब्ध होणार अशी जाहिरात झाल्यानंतर बुकगंगाच्या फोनलाईनवर प्रेक्षकांनी भरभरुन मागणी केली. याशिवाय अक्षरधारा आणि ग्रंथालीकडेही अंकाच्या मागणीचे दुरध्वनी आले आणि प्रत्यक्ष वाचकांनी भेट देऊन अंकाची नोंदणी केली. अवघ्या तीन दिवसांत पन्नास हजार अंक विकल्या गेले. यामध्ये केवळ राज्यातूनच नाही तर देशाच्या विविध भागांमधून आणि परदेशातूनही ऑनलाईन पद्धतीने अंक मागविणा-यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. अशा प्रकारे एवढ्या कमी कालावधीमध्ये दिवाळी अंक संपण्याची ही बहुधा पहिलीच घटना असावी. वाचकांचा हा वाढता प्रतिसाद बघता वाहिनीने आता पुन्हा २५ हजार अंक छापण्याची तयारी सुरु केली आहे. लवकरच हे अंक बाजारात उपलब्ध होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!