झी मराठी अवॉर्ड्मध्ये ‘लागिरं झालं जी’ ची बाजी

 

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी मराठीने यावर्षी अठरा वर्षे पूर्ण केली. अठरा वर्ष म्हणजे एका अर्थाने नवतारुण्यात पदार्पण. यामुळेच यावर्षी ‘उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा’ अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत आपला ठसा उमटवला. प्रेक्षकांच्या मतांद्वारे निवडण्यात येणा-या या पुरस्कारांसाठी यंदा भरघोस मतदानही झाले. राज्यातील २२ शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान, फेसबुकद्वारे मतदान, वेबसाईटवरुन मतदान आणि मिस्ड् कॉलद्वारे मतदान असे पर्याय ठेवण्यात आले. या सर्व माध्यमांतून प्रेक्षकांनी १२ लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला. झी मराठीवरील मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर नेला. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्यारविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार ? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार ?लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही होती. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं. याचा प्रत्यय प्रत्यक्ष पुरस्कार सोहळ्यातदेखील आला. ज्यामध्ये ‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी,  सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे,सर्वोत्कृष्ट आई,  सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!