शिवाजी चौक पुतळ्याच्या जीर्णोद्धार कामास  १० डिसेंबरला सुरवात :आ.राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर  : अनेक लढ्यांचा आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनलेल्या कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती  शिवाजी महाराज चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्या सभोवती असणाऱ्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली असून, हा संरक्षक कठडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या चौकाचे लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी चौकाच्या जीर्णोद्धाराच्या कामास येत्या १० डिसेंबर २०१७ रोजी सुरवात करण्यात येणार आहे. या कामाकरिता सुमारे एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून, लवकरच जनतेच्या या शक्तिस्थळास साजेसे ऐतिहासिक रूप प्राप्त करून देणार असल्याची माहिती आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, शके १८६७ (सन १९४६ दरम्यान) मध्ये भालजी पेंढारकर यांनी क.म. बाबुराव पेंटर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करून या चौकामध्ये स्थापन केला. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा स्वातंत्रलढ्याचा तसेच अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. तसेच अनेक आंदोलकांचे आणि युवकांचे स्फूर्तीस्थान आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या चोकची दुरवस्था झाली आहे. पुतळ्याभोवती असणारे लोखंडी कठडे तुटलेले आहेत. सद्यस्थितीत या सुशोभिकरणाच्या कामाच्या आराखड्याचे सादारीकरन करण्यात आले असून, कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा कोल्हापूर वासीयांची अस्मिता असून, या ऐतिहासिक स्थळाच्या सुशोभिकरणाच्या कामासही तेवढ्याच दिमाखात सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्वच नद्यांचे पाणी, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्यांवरील माती आणि कोल्हापूर शहरातील शाहूकालीन तालीम संस्थातील मातीचे संकलन करून त्यांच्या पूजनाने भव्यदिव्य सुशोभिकरणाच्या कार्यक्रमास सुरवात करणेत येणार आहे. या कार्यक्रमास पक्षीय, राजकीय मतभेद विसरून सर्व राजकीय पक्ष, संघटना, समाज आदींच्या सहभागाने हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. ढोल ताशे, लेझीम, मर्दानी खेळ आदी ऐतिहासिक कला प्रकारांचे सादरीकरण यावेळी होणार असल्याचेही, आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकाच्या शेवटी म्हंटले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!