पर्यावरणविषयक काळजी महत्त्वाचीच, परंतु प्लास्टिक्स उत्पादनांवर संपूर्ण बंदी अव्यवहार्य :आयप्मा

 

कोल्हापूर –  महाराष्ट्रात सरकारकडून पुढे आलेला प्लास्टिक्सच्या पिशव्या आणि पेट बाटल्यांवरील बंदीच्या विचाराचा कडवा प्रतिवाद करताना, ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात आयप्माने हे एक अत्यंत अव्यवहार्य पाऊल ठरेल, असे म्हटले आहे. आपल्या प्रतिपादनाचे सोदाहरण समर्थन करताना, आयप्माने सर्व सहभागींबरोबर चर्चा करून या प्रश्नावर व्यवहार्य समाधान शोधण्याचे आवाहनही सरकारला केले आहे. महाराष्ट्र शासनाने बाटलीबंद पेयजल निर्मात्या कंपन्यांना वापरलेल्या बाटल्यांच्या पुन:पुरवठ्याची तसेच त्यांच्यावर प्रक्रिया करून पुनर्वापराची (रिसायकलिंग) यंत्रणा सज्ज करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत दिली असून, त्याचे पालन न झाल्यास प्लास्टिक्सच्या वापरावर पूर्ण बंदी आणण्याचे सूतोवाच केले आहे. आयप्माने दावा केला की, वाहतूक, उत्पादन प्रक्रिया, विजेचा वापर, प्रक्रिया तापमान,स्क्रॅप रिसायकलिंग आणि धुलाई वगैरे प्रत्येक पातळीवर प्लास्टिक्समध्ये कोणत्याही अन्य पर्यायाच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयप्मा)चे अध्यक्ष हितेन भेडा यांनी या मुद्द्यावर विस्ताराने भाष्य करताना स्पष्ट केले – ‘‘प्लास्टिक उत्पादनांवर बंदी घालण्याचा विचार टाळून, सर्व भागधारकांबरोबर चर्चेतून संयुक्तपणे उपाय शोधण्याचा आम्ही सरकारकडे आग्रह करीत आहोत. प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी सर्व तांत्रिक साहाय्य पुरवण्यासाठी आयप्मा तयार आहे. सध्या भारतामध्ये,९० टक्के पेट बाटल्यांचे पुनर्नवीनीकरण होत आहे आणि जगभरात कच्ची सामग्री ही पुनर्नवीनीकरणातूनच उपलब्ध होत आली आहे. पेट बाटल्यांचा वापर आता पेय जल,स्वयंपाकासाठी तेल, वायूजन्य पेय, औषधे आणि इतर विविध प्रकारच्या पॅकेजिंगसाठी केला जातो. झिप-लॉक पिशव्या, दुधाचे पॅकेजिंग, तूप, आटा, तृणधान्ये, ब्रेड शिवाय अधिक काळ टिकून राहतील अर्थात मोठी शेल्फ लाइफची आवश्यकता असलेल्या इतर विविध खाद्यान्नांच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिक पिशव्या वापरात येतात. ओटीसी आणि विहित (प्रीस्क्राइब्ड) अशी बहुतांश औषधे पॅकेजिंगसाठी प्लास्टिकचाच वापर करतात. बंदीमुळे केवळ प्लास्टिक उत्पादन विश्वावरच नव्हे तर वापरकर्ता जगतावरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. बंदीची अंमलबजावणीदेखील एक आव्हान असेल कारण ग्राहकांना शेजारच्या राज्यांमधून प्लास्टिक्सच्या वस्तू मिळविणे अवघड नसेल. त्यामुळे अशी बंदी ही ‘एक राष्ट्र- एक बाजारपेठ’ तत्त्वाच्या विरोधात जाणारे असेल.”

असोसिएशनचे चेअरमन श्री. हरेन संघवी यांच्या मते,प्लास्टिक्स उद्योगजगतात एकंदर ५५,००० प्रक्रिया कंपन्या, २०,००० रिसायकलिंग आस्थापने, ५५ लाख थेट रोजगार मिळविणारे कर्मचारी आणि भंगार-कचरा वेचकांसह एकूण ७० लाख अप्रत्यक्ष रोजगार मिळविणाऱ्या श्रमिकांचा समावेश होतो. प्लास्टिक्सवर बंदी आणून सरकारला इच्छित समस्येचे निराकरण करता येणार नाही, उलट बेरोजगारीला चालना आणि औद्योगिकरणाच्या विरोधात पडलेले हे पाऊल ठरेल. कचरा संकलनात सुधार आणि इतस्तत: कचरा फेकण्यावर बंदी हाच त्यावरील समंजस पर्याय आहे.

प्लास्टिक्सच्या पर्यावरणावरील परिणामांची मीमांसा करताना आय़प्माच्या पर्यावरणीय समितीचे अध्यक्ष अखिलेश भार्गव यांनी, प्लास्टिकला पर्यायी सामग्रीच्या वापराने उलट पर्यावरणाला अधिक नुकसान आणि आरोग्याला अपायाची मोठी जोखीम असल्याचा दावा केला. वापरात आलेल्या काचेच्या बाटल्यांच्या एका करंडीच्या धुलाई आणि स्वच्छतेसाटी २० लिटर पाणी लागेल, म्हणजे वर्षाला यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण १२० कोटी लिटरच्या घरात जाणारे असेल. महाराष्ट्रासारख्या दुष्काळप्रवण राज्यात पाणी खूप मौल्यवान आहे. काचेच्या बाटल्या साध्या धुलाईने निर्जंतूक होत नसल्याने त्यात पाणी साठविणे अनारोग्यकारकच ठरेल. एका एचडीपीई प्लास्टिक पिशवीच्या निर्मितीतून जागतिक तापमान वाढीत १.५७ किलोग्रॅम कार्बन डाय ऑक्साइड वायू उत्सर्जनातून संभाव्य योगदान मानले गेले, तर पुनर्वापर शक्य नसलेल्या कागदी पिशवीसाठी ते प्रमाण चार पट अधिक निश्चितच असेल. आणि कापडी पिशवीबाबत तितक्याच प्रमाण कर्ब वायू उत्सर्जन टाळायचे झाल्यास तिचा किमान १७१ वेळा पुनर्वापर होणे अपरिहार्य ठरेल.

प्लास्टिक्स जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अभेद्य घटक बनले आहे. शाळेत जाणारे मूल काचेच्या बाटलीतून पाणी नेत आहे अथवा दररोज खरीदले जाणारे दूध हे प्लास्टिक पाऊचशिवाय अन्य कोणत्या मार्गाने मिळविण्याचा कल्पना करणेही आपल्यासाठी अवघड ठरेल. प्लास्टिक्सची आरोग्यनिगेतही महत्त्वाची भूमिका आहे. रुग्णांना नळीवाटे दिले जाणारे द्रव्य हे प्लास्टिक बाटल्यांमध्ये आणि जीवनदान करणारे रक्तही प्लास्टिक पाऊचमधूनच वाहून नेले जाते. इंजिन ऑइल ते अगरबत्ती घरोघरी पोहचणाऱ्या सर्व चीज-वस्तूंचे पॅकेजिंग प्लास्टिक्समध्ये होते. मोबाईल फोन, कॉम्प्युटर, पेन, क्रेडिट कार्ड्स वगैरे सर्व प्लास्टिक्समधून घडतात. घराबाहेर पडले असता पिण्यास सर्वात सुरक्षित पाणी हे प्लास्टिकच्या बाटल्यातूनच उपलब्ध होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!