
कोल्हापूर: कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देवून नवे नवे प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरचा पंचगंगा घाट विकासासाठी 23 कोटीचा निधी मंजूर केला आहे तर शाहू जन्मस्थळ याठिकाणी राजर्षी शाहूंचे संग्रहालयास 13 कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासासाठी पुरेशी मदत आणि पाठपुरावा करण्यास प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोल्हापुरच्या पर्यटन विकासासाठी नव नवे उपक्रम राबविताना येत्या 8 ते 13 फेब्रुवारी मध्ये सहा दिवसांचा कोल्हापूर महोत्सव आयोजित करुन आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलावंताना आमंत्रित केले जात आहे. तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याचे नियेाजन केले असून 1 एप्रिल पासून या उपक्रमाला सुरुवात केली जाईल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलच्या रुपाने कोल्हापुरचे नाव देशभर पोहचविण्यासाठी केएसबीपीचे सुजय पित्रे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घेतलेल्या परिश्रामाचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील स्पर्धाकांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. तसेच फुलोत्सव या अंकाचे प्रकाशनही त्यांच्याहस्ते करण्यात आले.
प्रारंभी कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाचे प्रमुख सुजय पित्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी कोल्हापूर रस्ते सौदर्यीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूरात पर्यटन वाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हला सुमारे साडे सहा ते सात लाख लोकांनी भेट दिल्याचे सांगितले.
या पोलीस उपाधीक्षक प्रशांत अमृतकर, निर्मितीचे अनंत खासबागदार, शिरिष खांडेकर, पणनचे विशेष लेखापरिषक बाळासाहेब यादव, विद्याप्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे, संजय घोडावत ग्रुपचे विश्वस्त विनायक भोसले यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, शहरातील नर्सरीचालक आणि नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply