
कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ कणेरी येथे येत्या ११ ते १५ फेब्रुवारीदरम्यान सिद्धगिरी कारागीर महाकुंभ २०१८ सुरू होत आहे. येथे कारागीर ज्ञानपीठ स्थापन होत असून, त्याचे उद्घाटन होत आहे. यानिमित्त मठाधीश अदृश्य काडसिद्धेश्वर यांच्या पुढाकाराने ज्ञानपीठ सुरू होत आहे. त्यासोबत होणाऱ्या महाकुंभ उत्सवात देशभरातील दीडशेवर कारागीर व कलावंत सहभागी होणार आहेत. केंद्रीय कृषिराज्यमंत्री श्रीमती कृष्णा राज यांच्या हस्ते या महाकुंभाचे उद्घाटन होईल.
बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार यांच्या पिढ्यांतून लुप्त होणाऱ्या आपल्या परंपरागत कलाकौशल्याचे प्रात्यक्षिक विविध कारागीर दाखविणार आहेत. यात विणकाम करणारे नाजूक कलाकुसरीचे कारागीर, कर्नाटक राज्यातील स्फटिकात मूर्ती तयार करणारे कारागीर, दिमडीपासून ढोल, ताशापर्यंतची वाद्ये व पखाली, मोट तयार करणारे चर्मकार; तांबे, पितळ, काशाची भांडी बनविणारे कारागीर, पामच्या वस्तू तयार करणारे; नारळाची पाने, फुले, चटई, भिंतीवर टांगावायच्या शोभेच्या वस्तू तयार करणारे अवलीया कारागीर,
मातीची विविध प्रकारची भांडी बनविणारे कुंभार कारागीर, देशातील खेळण्यांची राजधानी असलेल्या ‘चेन्नापट्ट ना’ बेंगळुरु येथील कलाकार; जनावरांच्या शेणापासून शोभेच्या वस्तू व वापरातल्या वस्तू बनविणारे कारागीर, शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या हजारो वस्तू तयार करणारे कारागीर, गोधडीपासून तयार केलेले जाकीट, ओढणी, उपकरणे आदी वस्तूंचे कारागीर यांची प्रात्यक्षिके प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
रविवारी सकाळी ९ वाजता रायबरेली संस्थेचे बेडराजा कौशलेंद्र सिंह यांच्या हस्ते शोभायात्रेचे उद्घाटन होईल. सिद्धगिरी कारागीर ज्ञानपीठ व महाकुंभाचे उद्घाटन केंद्रीय कृषिराज्यमंत्री कृष्णा राज व पालकमंत्री चंद्रकांत पाटील, स्वामी त्यागवल्लभजी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता होईल.
खाद्य महोत्सवाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते साडेअकरा वाजता होईल. याशिवाय विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने होतील.
महाकुंभाचे आकर्षण
- या महाकुंभात गोपालन स्पर्धा होणार आहे.
- उत्कृष्ट गाईला कामधेनू पुरस्कार.
- बारा लिटर दूध देणारी देशी खिल्लार गाय, पंधरा लाखांचा खिल्लार वळू, भारतातील सर्वांत मोठा गीरचा नंदी, आज्ञाधारी गाय व आज्ञाधारी बैलाच्या कसरती पाहण्याची संधी.
- खाद्यमहोत्सवात देशभरातील विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्याची संधी.
- १२० प्रकारचे डोसे तयार करून देणारा हैदराबादचा अवलीया, खानदेशी मांडे, पाच प्रकारच्या भाकरी, २५ प्रकारच्या चटण्या, राजस्थानी २५ प्रकारची लोणची व खाद्यरसिकांसाठी खास दालन असेल.
Leave a Reply