
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही कोल्हापूरची शिखर संस्था असून गोकुळ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची खऱ्या अर्थाने अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणारे दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध संघामार्फत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, काटकसरीचा कारभार, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ याचबरोबर वाशी दुग्ध शाळेचे विस्तारीकरण, नुकताच कार्यान्वित झालेला करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्प असे धोरणात्मक निर्णय यामुळे संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगलीच वाढ झालेली आहे. गोकुळचे नेते व संचालक मंडळ यांनी बैठक घेऊन हिरक महोत्सवी भेट म्हणून गोकुळच्या दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूध दर फरक, हिरक महोत्सवी दरफरक २० पैसे प्रती लिटर, दूध फरकावरील व्याज, डिबेंचर्सव्याज, डिव्हिडंड(वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनुसार) असे एकूण रुपये १३६ कोटी ०३ लाख इतकी रक्कम दूध संस्थेंच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. हि रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूध दर फरकाच्या रक्कमेपेक्षा २२ कोटी ३७ लाख इतकी जास्त आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टीमिन प्लस मिनरल मिक्स्चरच्या ४ लाख ७३ हजार ५४२ इतक्या बॅग्ज मोफत देण्यात आल्या असून त्याची किंमत ७ कोटी १० लाख ३१ हजार ३०० इतकी होते. याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे. अशी माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.
Leave a Reply