
कोल्हापूर: ‘गुलकंद’ चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता आणखीच वाढली आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेटक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आता घर करण्यास सज्ज आहे. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘गुलकंद’ची निर्मिती सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी केली आहे.
ट्रेलरमधून “प्रेम कधीही, कुठेही, कुठल्याही वयात होऊ शकतं” या प्रसादच्या संवादाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कथेत ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नासाठी दोन कुटुंबं एकत्र येतात. परंतु या भेटीत अजून एक वेगळंच नातं निर्माण होतं. आता ढवळे आणि माने कुटुंबांमध्ये काय गोंधळ उडणार? आणि ही गुंतागुंत सुटेल का? याचं उत्तर १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात मिळणार आहे. ‘गुलकंद’ हा एक हलकाफुलका कौटुंबिक विनोदी चित्रपट असून, नात्यांमधली गुंतागुंत, भावना, हास्य आणि गोडवा यांचा एक सुरेख मेळ आहे. ढवळे-माने कुटुंबांच्या संसारात मुरलेला ‘गुलकंद’ प्रेक्षकांसाठी एक परिपूर्ण मनोरंजनाचा अनुभव ठरेल, याची खात्री आहे.
चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. ‘चंचल’ या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळुवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत. या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले आहे तर अविनाश – विश्वजित यांनी संगीत दिले आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. चित्रपटातील दुसरं गाणं ‘चल जाऊ डेटवर’ हे गाणंही सध्या ट्रेण्डिंगमध्ये आहे. गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना भावणारे आहे. हे गाणं ऐकायला जितकं छान आहे, तितकंच त्याचं सादरीकरणही अप्रतिम आहे. वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला प्रशांत मडपूवार यांच्या शब्दांची व अविनाश विश्वजित यांच्या जबरदस्त संगीताची जोड लाभली आहे.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणतात, “नातं जेव्हा एकसुरी होतं, तेव्हा त्यातला गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं आणि हाच गोडवा ‘गुलकंद’ चित्रपटात आहे. प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आपलं वाटेल. आजवर आम्ही अनेक विनोदी प्रोजेक्ट्स केले, पण या चित्रपटात भावना, नाती, प्रेम आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे. एव्हरेस्टचे संजय छाब्रिया या कुटुंबाचा भाग झाले, हे आमचं भाग्य. ही टीम एकमेकांना ओळखते, त्यामुळे ‘गिव्ह अँड टेक’ अप्रतिम झाला आहे. हाच अनुभव प्रेक्षकांना मिळेल.”
निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, “‘गुलकंद’ हे आमचं एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे. दर्जेदार आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा असा चित्रपट आम्ही आणत आहोत. कलाकार, दिग्दर्शक, सगळ्यांनी कमाल काम केलं आहे. मला विश्वास आहे की, प्रेक्षकांना या गोडसर अनुभवाचा नक्कीच आनंद मिळेल.” आज चित्रपटातील कलाकारांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्यांच्या घरातली गोष्ट असल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Leave a Reply