
कोल्हापूर: संख्याशास्त्राला म्हणजेच न्युमरॉलॉजीला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. या संख्याशास्त्रावर आधारित अचूक भविष्य सांगणार्या पुण्याच्या ख्यातनाम अंकशास्त्र तज्ञ श्वेता जुमानी या कोल्हापूरवासीयांशी संवाद साधणार आहेत. अंकशास्त्राचा वापर करुन आपल्या व्यक्तिमत्वात कशा पद्धतीने बदल घडवता येतात, तसेच नोकरी, व्यवसाय यामध्ये सकारात्मक बदल कसे घडवता येतात, याबाबत श्वेता जुमानी या, जुमानी की जुबानी या कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. मंगळवार २० फेब्रुवारीला दुपारी ३ः३० वाजता, केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
प्रसिद्ध अंकशास्त्र तज्ञ श्वेता जुमानी यांनी अंकशास्त्राच्या आधारे अनेकांच्या जीवनामध्ये आश्चर्यकारक बदल घडवून आणले आहेत. नावापुढील आद्याक्षरे किंवा आडनावामधील अक्षरे बदलून, कशा पद्धतीने जीवनात प्रगती साधता येते, याबाबतचा श्वेता जुमानी यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रेटी आणि राजकारणी लोकांना झाला आहे. त्यामुळे श्वेता जुमानी यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी राज्य आणि देशभरातील नागरिकांची नेहमीच गर्दी असते. कोल्हापूरवासीयांना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी भागीरथी महिला संस्था, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज, रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि मुक्ता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमात सहभागी होणार्या नागरिकांसाठी अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत कार्यक्रमात सहभागी व्हा, मिसकॉल द्या आणि बक्षिसे जिंका, अशी योजना राबविण्यात येणार आहे. अंकशास्त्राचे महत्व समजून घेवून, आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
Leave a Reply