
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडियोत उदयास आलेल्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शृंगाराने सजलेल्या या बॉलीवूड थीमपार्कात दि. १७ आणि १८ मार्च दरम्यान पार पडलेल्या या सोहळ्यात गोविंदाच्या हस्ते भारतातील सर्वात मोठी ५१ फुट लांबीची गुढी उभारण्यात आली. मराठी नववर्षाच्या दिमाखदार सुरुवातीसाठी बॉलीवूड थीमपार्कात भव्य शोभायात्रादेखील काढण्यात आली.
भारतीय नियतकालिकेनुसार ‘चैत्र पाडवा’ म्हणून संबोधल्या जाणा-या या नववर्षाच्या स्वागतासाठी बॉलीवूड थीमपार्कात आलेल्या प्रत्येक माणसाचा एन. डी.स्टुडीयोत खास पारंपारिकपद्धतीने पाहुणचार करण्यात आला. सामान्य प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आलेल्या या थीमपार्कमध्ये केवळ हिंदीच नव्हे तर अखंड भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पाहायला मिळतो. कृष्णधवल ते रंगीत अशी भारतीय चित्रपटसृष्टीच्या दीर्घ प्रवासाची सफर यात घडत असून, फिल्मी परेडचा रोमांचित करणारा अनुभव प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहे.
मोठ्या पडद्यावर दिसणारे भव्य राजवाडे आणि गड किल्ल्यांचे सेट्स येथे उभारण्यात आले असून, सिनेरासिकांसाठी हे सर्व सेट्स कुतूहलाचा विषय ठरत आहे. अनेक सुप्रसिद्ध सिनेमांचे चित्रीकरण झालेल्या या वास्तूत प्रेक्षकांना चक्क वावरतादेखील येत आहे. या महाफिल्मोत्सवामध्ये सिनेमातील स्टंट, नाचगाणी तसेच अॅक्शनपटात सिनेरसिकाना स्वतः सहभाग घेता येत असल्यामुळे, सिनेचाहत्यांसाठी एन.डी. स्टुडीयोतील हे बॉलीवूड थीमपार्क पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे, हे नक्की !
Leave a Reply