गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थाच्या खात्यावर १०२ कोटी ८३ लाख जमा होणार :चेअरमन विश्वास पाटील

 

कोल्हापूर :“ दूध उत्पादक शेतकरी हा गोकुळचा कणा आहे. गोकुळ दूध संघामार्फत सातत्याने दूध उत्पादक सभासदाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०२
कोटी ८३ लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थाच्या खात्यावर ४ ऑक्टोबर २०२२ रोजी जमा करण्यात येणार आहे.” अशी माहिती गोकुळचे चेअरमन विश्वासराव नारायण पाटील यांनी दिली. यंदा, फरकापोटी दूध उत्पादकांना गेल्यावर्षीपेक्षा १९ कोटी रुपये इतकी जादा रक्कम मिळणार आहे.’असेही पाटील यांनी नमूद केले.
“दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि विश्वासावर गोकुळ फुललेला आहे. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार वर्षी संघाने म्हैस दूधाकरीता ५८ कोटी ९४ लाख ७१ हजार रुपये तर गाय दूधाकरीता २९ कोटी ७१ लाख २० हजार रूपये इतका दूध दर फरक व त्यावरील ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४८ लाख रुपये व डिंबेचर व्याज ६ टक्के प्रमाणे ४ कोटी ७२ लाख रूपये व शेअर्स भांडवल ४ वर ११ टक्के प्रमाणे डिव्हिडंड ५ कोटी ९८ लाख रूपये असे एकूण १०२ कोटी ८३ लाख रूपये इतकी रक्कम दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बॅकेत जमा केली जाणार आहे. दूध उत्पादक सभासदांसाठी सणाच्या अगोदर गोकुळकडून एका अर्थाने ही दिवाळी भेट आहे.’’अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.
गोकुळने दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना व विकास प्रकल्प राबविले आहेत. गोकुळच्या सभासदहिताच्या योजनेविषयी सांगताना चेअरमन पाटील म्हणाले, “संघाच्या वेगवेगळया योजनेअंर्तगत वैरण बियाणे, चाफकटर, मिल्को टेस्टर, वासरू संगोपन अनुदान, जातीवंत म्हैस व गाय संगोपन अनुदान, दूध उत्पादक भविष्य कल्याण निधी योजना, किसान पॅकेज, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा अशा २७ योजनेवर प्रतिलिटर ७५ पैसे म्हणजेच अंदाजे ३७ कोटी ४१ लाख इतकी रक्कम उत्पादकांना वेगवेगळया अनुदान व सेवाप्रित्यर्थ दिले आहेत.”
चेअरमन पाटील म्हणाले, “दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध आहे. राज्याचे माजी ग्रामविकास व कामगारमंत्री आमदार व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ व कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यापुढेही गोकुळची वाटचाल तितक्याच दिमाखात व यशस्वीपणे पुढे चालू ठेवू. यासाठी दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे आहे. दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतकांना दसरा व दीपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा !!’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!