
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव असताना तेव्हा भाजपने आता म्हणत असलेल्या संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपली नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने निवडणूक लादली तरी कोल्हापूर शहरातील स्वाभिमानी जनतेच्या पाठिंब्यामुळे माझा विजय सुकर झाला, असल्याचे आमदार जाधव यांनी सांगीतले.अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपने माघार घेतली. या नंतर पोटनिवडणूक झालेल्या कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणुकीचीही चर्चा होत आहे. कोल्हापूर मधील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गतवर्षी डिसेंबर महिन्यात निधन झाले. त्यानंतर पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. तेव्हा कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव दिला होता. पण भाजपने जयश्री जाधव यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह धरला होता. मात्र जाधव यांनी पती चंद्रकांत जाधव यांच्याप्रमाणेच काँग्रेस कडून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली. त्यावर भाजपने पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम राहिला.आता अंधेरी पोट निवडणुकीनंतर भाजप संवेदनशील राजकारणाची संस्कृती जपत असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले आहे. भाजपच्या दुहेरी भूमिकेवर आमदार जयश्री जाधव यांनी सोमवारी नाराजी व्यक्त केली. त्यांनी पोटनिवडणुकीतील घटनाक्रम व्यक्त करीत सांगितले कि, पती निधनानंतर पत्नीला विजयी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. शिवाय अडीच वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक होणार होती. तरीही भाजपने बिनविरोधचे पालन न करता निवडणूक लादली तरी स्वाभिमानी जनतेच्या पाठबळावर एप्रिल महिन्यात झालेल्या निवडणुकीत यश मिळवून दाखवले, असे जाधव यांनी सांगितले.”
Leave a Reply