
स्वर्गीय आ .चंद्रकांत जाधव आण्णा एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते..आण्णांची आठवण होताना मन भरुन येते. कारण दोन वर्षे आम्ही दोघांनी सहकारी आमदार म्हणून हातात हात घालून कोल्हापूरच्या विकासासाठी काम केले. राजकारणापेक्षा समाजकारणालाच प्राधान्य देणाऱ्या आण्णांच्या स्वभावातील साधेपणा आणि कामातील चिकाटी मी जवळून अनुभवली आहे.कोल्हापूरातील सामान्य जनतेबरोबर आण्णांचे जिव्हाळ्याचे नाते होतेच. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या समस्या मांडणारे सहकारी होते. माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यासाठी आण्णा मार्गदर्शक होते.वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने विविध खात्याच्या मत्र्यांना भेटताना कोल्हापूरच्या विकासाचे प्रश्न आण्णा पोटतिडकीने मांडत होते. काही वेळा आपण जसे आपआपल्यात बोलतो त्याप्रकारे ते बोलायचे. पण हे करत असताना मंत्री महोदयांना काय वाटेल यापेक्षा कोल्हापूरसाठी जास्तीतजास्त निधी कसा आणता येईल यासाठी भांडायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते.कोरोना, महापूर या संकटामध्ये आण्णांनी कोल्हापूरच्या जनतेसाठी काम केले. आपल्या पेक्षा लोकांची जास्त काळजी करणाऱ्या आण्णांनी कोरोनानंतर डॉक्टरांचा सल्ला असूनही फारशी विश्रांती घेतली नाही. आणि इथंच काहीतरी चुकलं आणि लोकांची सेवा करता करता आण्णा आपल्यातुन निघुन गेले.
एकादी गोष्ट करताना आण्णा आपल्याला काय त्रास होतो हे कधीही मागेपुढे पाहत नव्हते. काही कामांच्या उद्घाटनाच्यावेळी आम्ही एकत्र असायचो. दोन-तीन वेळा तर पायाला सुज आली असताना सुध्दा ते लोकांच्यासाठी कार्यक्रमाला आले होते. बंटी साहेबांच्या विधानपरिषद निवडणुकीवेळी आण्णांना व्यवस्थित चालता येत नव्हते. तरीसुध्दा गाडीत व्हीलचेअर ठेवून ते जिल्हाभर आमच्याबरोबर फिरत होते. माझ्या निवडणुकीत बंटीसाहेब राबले आता त्यांच्यासाठी राबायची वेळ आल्यावर मी घरात बसणार नाही, असे ते म्हणत होते.एकदा हातात काम घेतलं की मागेपुढे पाहायचे नाही, येईल त्या संकटाला तोंड देत पुढे जायचे असे आत्मविश्वासाने बोलणारे चंद्रकांत आण्णा होते.प्रश्न मांडताना त्यांनी आपल्या कोल्हापूरी शैलीतच प्रश्न मांडले.कोल्हापूरातील सर्किट हाऊसवर अजितदादा पवार यांची मिटींग सुरु असताना आण्णा मोठ्या पोटतिडकीने आपले म्हणने मांडत होते. समोर दादा असताना एवढे बोलणे हे लोकप्रतिनिधींना सहजासहजी शक्य होत नाही. पण आण्णांनी मात्र फुटबॉलच्या मैदानावर काही झाले तरी गोल करायचाच या बाण्याप्रमाणे शहराच्या विकासासाठीचे आपले म्हणने मोठ्या ताकदीने मांडले.अत्यंत कष्टातून स्वत: उद्योजक झालेल्या आण्णांनी उद्योजकांचे प्रश्न सातत्याने मांडले. वीज दराचा प्रश्न, संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसमोर मांडण्यासाठी ते सातत्याने पाठपूरावा करायचे.गोशीमाचे दोन वेळेस अध्यक्ष झालेल्या आण्णांनी फौंड्री मध्ये वापरलेल्या वाळूचे पुढे काय करायचे ? या प्रश्नावर समर्पक उत्तर शोधले आणि किफायतशीर किमती मध्ये सँड रिक्लेमेशन प्लँट सुरु करुन उद्योजकांना दिलासा दिला होता.स्वत: उत्कृष्ट फुटबॉल पटू असणारे आण्णा खेळाच्या विकासासाठी सातत्याने चर्चा करायचे. कोल्हापूरात त्यांनी फुटबॉल बरोबर सर्व खेळांनाच प्रोत्साहन दिले आणि सढळ हाताने मदत सुध्दा केली. खऱ्या अर्थाने ते जनतेचे आमदार होते.आण्णांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांनी राजकारणापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता. पण आण्णांनी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून असंख्य मानसं जोडली होती. या जोरावरच आणि कोल्हापूरच्या जनतेच्या पाठबळावर जयश्री वहिनी आमदार झाल्या आणि आण्णांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुध्दा काम सुरु आहे. यामध्ये त्या नक्की यशस्वी होतील असा विश्वास वाटतो.
आण्णांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांना मनापासून अभिवादन !
Leave a Reply