कोल्हापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे आण्णा :आ.सतेज पाटील

 

स्व. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना त्यांच्या अनेक आठवणी मनामध्ये दाटून येतात. आण्णा म्हणजे सातत्याने कोल्हापूर शहराच्या विकासाचा विचार घेवून पुढे जाणारे लोकप्रतिनिधी होते. ज्या लोकांनी आपल्याला आमदार केले आहे, त्या लोकांच्यासाठी मला काम करायच आहे अशी इच्छा बाळगून त्यांनी दोन वर्षाच्या काळामध्ये तळमळीने काम केले. या काळात रस्त्यावर फिरणारा माणूस, पुरामध्ये फिरणारा माणूस अशी प्रतिमा त्यांनी निर्माण केली होती.

आण्णा हे मुळात कष्टातून मोठे झालेले व्यक्तीमत्व होते. सेंट्रींगच काम करुन हा माणून मोठा झाला होता. फॅक्टरीमध्ये कामगार म्हणून त्यांनी काम केले आणि स्वत:च्या जिद्दीच्या जोरावर उद्योग क्षेत्रामध्ये अनेक उद्योग उभारुन शेकडो लोकांच्या हाताला काम मिळवून दिले. आमदार होण्यापूर्वी तसेच आमदार झाल्यानंतर सुध्दा उद्योजकांचे प्रश्न सातत्याने त्यांनी शासन दरबारी मांडले. उद्योजकांना इतर राज्यांत असणाऱ्या वीजदराप्रमाणे महाराष्ट्रातही वीज उपलब्ध व्हावी यासाठी त्यांचा पाठपूरावा सुरु होता. कोल्हापूरातील उद्योग वाढावेत ते टिकावेत ही त्यांची तळमळ होती. त्याचबरोबर बी टेन्यूयरचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत होते.
आण्णांची जडण-घडण ही मंगळवार पेठेत झालेली असल्याने खेळ आणि खिलाडू वृत्ती त्यांच्या अंगामध्ये भिनलेली होती. एक नामवंत फुटबॉलपटू म्हणून त्यांनी नाव कमावले होतेच पण त्याही पुढे जाऊन फुटबॉल खेळाडूंना, संघांना मदत करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिले नाही.
सामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणून त्यांनी काम केले. प्रत्यक्ष रस्यामावर उतरुन लोकांचे प्रश्न समजून घेणे, ते सोडवण्यासाठी प्रयत्न आणि पाठपुराव करणे ही त्यांची कामाची पध्दत होती. कोणतेही काम करताना नियोजन पूर्वक आणि बारकावे जपत करण्यात त्यांचा हातखंडा होता. कोल्हापूर शहराच्या विकासासाठी सातत्याने त्यांची धडपड सुरु असायची. महावीर गार्डन आणि हुतात्मा पार्क गार्डन हे आपल्या शहराचे दोन ऑक्सिजन पार्क आहेत आणि या दोन्ही गार्डनचा विकास झाला पाहिजे ही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यासाठी स्वतः 15 लाख रुपये खर्चून एका आर्किटेक्ट कडून या गार्डनच्या विकासाचा प्लॅन बनवून घेतला होता. दोन तास देणार असाल तरच हा प्लॅन तुम्हाला मी दाखवणार, असे मला त्यांनी सांगितले हेाते. त्यांची तळमळ पाहून मी त्यांना त्यासाठी वेळ दिला आणि त्यांनी बनविलेला हा प्लॅन इतका चांगला होता की मी ही अश्चर्यचकीत झालो. कोल्हापूर शहरातील पहिला स्काय वॉक हा हुतात्मा पार्क मध्ये फक्त चंद्रकांत जाधवांमुळेच होणार आहे. त्याचबरोबर शाहू मिल येथील जागेमध्ये राजर्षि छत्रपती शाहू महाराजांचे यथोचित स्मारक व्हावे यासाठीही ते सातत्याने प्रयत्न करत होते.
आण्णा हे स्पष्ट वक्ते होते. कोवीडच्या काळामध्ये बऱ्याच मिटींग या ऑनलाईन होत होत्या. या व्हीसी मध्ये समोर मंत्री, शासकीय अधिकारी असताना सुध्दा ते बेधडक बोलायचे.

माझ्या कोल्हापूरचे प्रश्न आहेत मी ते मांडणारच असे ते नेहमी म्हणायचे . लोकांचे प्रश्न सुटावेत हीच त्यांची नेहमी भावना असायची.

सर्वच शासकीय विभागामध्ये त्यांनी एक वचक निर्माण केला होता. लोकांच्या कामासाठी ते पाठपुरावा करायचे. त्यांनी मी मंत्री असताना मला त्यांचे कोणतेही वैयक्तीक काम सांगितले नाही. ते जे काम घेऊन आले ते कोल्हापूरच्या हिताचे आणि कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने असायचे.

महापूर तसेच कोवीडच्या काळामध्ये त्यांनी लोकांसाठी प्रचंड काम केले. हे करताना कोवीडच्या काळात ते स्वतःची काळजी घेत होते. परंतू दूर्देवाने त्यांना या आजाराची लागण झाली. त्यांना मी महिनाभर घरातून बाहेर पडू नका,काळजी घ्या, असे सांगितले होते. पण कोल्हापूरच्या 91 हजार लोकांनी मते देवून मला आमदार केले आहे, त्यामुळे या संकट काळामध्ये मी घरात बसणार नाही. मला लोकांसाठी काम करावेच लागेल ,अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांच्यामध्ये लोकांची सेवा करण्याची एक उमेद होती. त्यांच्या अंगात एक शक्तीच होती.

माझ्या विधान परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये ते सक्रीय होते. त्यांचे पाय सुजले असताना देखील ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला आहे. एवढेच नव्हे तर गाडीत व्हीलचेअर ठेवून माझया प्रचारासाठी शाहूवाडी, चंदगड, इचलकरंजी, वडगाव आदी ठिकाणच्या नगरसेवकांना भेटायला गेले होते, हे मी कधीही विसरु शकत नाही.
माझी विधान परिषदेची निवडणुक बिनविरोध झाल्याचे समजताच आयसीयू मधून त्यांनी मला अभिनंदनाचा फोन केला होता. मी आण्णांना सांगितले होते की, तुम्ही बरे होवून परत येणार आहात, मी तुम्हांला बघायला हैद्राबादला येतोय. पण अचानक सर्व गोष्टी घडल्या आणि आण्णांची शेवटी भेट होवू शकली नाही, याचे शल्य वाटते.

आमदार होण्यापूर्वी आण्णा अन्य पक्षात कार्यरत होते. पण 20 दिवसात विधानसभेसाठी काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित होवून ते निवडून सुध्दा आले. त्यांच्या अचानक जाण्यानंतर झालेल्या पोट निवडणुकीत कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आण्णांच्या माघारी जबाबदारी घेवून त्यांच्या पत्नी जयश्री ताईंना आमदार करुन आण्णांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केली.

कैलासगड स्वारीचे परमभक्त असणारे, दिलेला शब्द पाळणारे आण्णा हे एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व होते. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आण्णांनी कोल्हापूर शहराच्या विकासाचे जे स्वप्न पाहीले होते ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजन मोठ्या ताकदीने प्रयत्न नक्कीच करु. त्यांच्या प्रथम स्मृतीदिनी श्रध्दांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!