सफाई कामगारांच्या स्वमालकीच्या घरासाठी तातडीने कार्यवाही करा :आम.ऋतुराज पाटील

 

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यासाठी योग्य नियोजन करून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. कामगार चाळ पुनर्विकासासाठी आयोजित महापालिका अधिकारी आणि सफाई कामगार यांच्या संयुक्त बैठकीत आमदार पाटील बोलत होते. या निर्णयामुळे रेसकोर्स नाका आणि शिवाजी पेठ येथील मुळ जागेवर सात मजली इमारतीचे नियोजन करून सुमारे १३८ सफाई कामगार कुटुंबांना कायमचा आणि हक्काचा निवारा मिळणार आहे . त्यामुळ सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय संभाजीनगर येथील रेस कोर्स नाक्याजवळील कामगार चाळीत आणि शिवाजी पेठ परिसरातील बैठ्या चाळीत भाडेतत्त्वावर करण्यात आली आहे. रेस कोर्स नाका येथील कामगार चाळीमध्ये सध्या सफाई कामगारांची ९७ कुटुंबे तर शिवाजी पेठ येथील बैठ्या कामगार चाळीमध्ये ४१ कुटुंबे वास्तव्यास आहेत . मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे सफाई कर्मचारी रहात असलेल्या इमारतींची दुरावस्था झाली आहे. या इमारतींची डागडुजी व्हावी, यासाठी अनेकदा प्रयत्न झालेत . मात्र ते प्रयत्न अपुरे ठरले होते . यावर तोडगा काढण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी गुरुवारी महापालिका अधिकारी आणि सफाई कामगारांची एकत्रित बैठक घेतली.यावेळी कॉंग्रेस शहराध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी सफाई कामगारांच्या घराबाबतची सद्य:परिस्थिती आणि उपाययोजनांबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर रेसकोर्स नाका कामगार चाळ आणि शिवाजी पेठ येथील बैठ्या कामगार चाळ अशा एकूण १३८ कुटुंबांसाठी नव्याने गृहप्रकल्प उभारावा. यामध्ये सर्वच सफाई कामगारांना मालकी हक्काचे घर देण्यात यावे, याबाबत योग्य ते नियोजन करून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या .

हा गृह प्रकल्प सात मजली इमारतीमध्ये होणार असून, सफाई कामगारांना प्रत्येकी ३५० स्क्वेअर फुटाचे स्वमालकीचे घर मिळणार आहे . त्यामुळ त्याच्या भविष्यातील डागडुजीची जबाबदारी सफाई कामगारांनी घेणे अनिवार्य असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले . या निर्णयामुळ सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत आणि सध्याचा रेडी रेकनर दर यावर या इमारतीमधील प्रत्येक घरांची किंमत ठरणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी नमूद केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपायुक्त रविकांत अडसूळ, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, उपशहर अभियंता एन . एस . पाटील, नगररचना सहाय्यक संचालक रमेश मस्कर प्रधानमंत्री आवास योजनेचे विशेषज्ञ युवराज जबडे यांनी गृहप्रकल्पाविषयी माहिती दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुयोग मगदूम, किशोर यादव, प्रदीप चौगुले, नंदकुमार मराठे, आशिष खोराटे, अनिल पटवणे, हेमंत पटवणे, चेतन सोनवणे, अतुल बनगे, राजू चंडाळे, शब्बीर शेख,रतन पच्छरवाल, सुनिल गोहीरे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!