
कोल्हापूर : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, केंद्रीय प्रदूषण मंडळाची मूर्ती विसर्जनावर नवी गाईड लाईन नुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय नाही. यासह गेल्या दोन वर्षात महापूर आणि कोरोनामुळे कुंभार बांधवांवर कर्जाचा डोंगर झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या वतीने मे.मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच यांचेकडे जनहित याचिकेद्वारे दाद मागितली आहे. त्या अनुषंगाने मे.न्यायालयाने महाराष्ट्र शासनाकडे यासंबधी अहवाल मागविला असून, मा.मुंबई उच्च न्यायालय नागपूर बेंच यांच्या जनहित याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाने सादर करावयाच्या अहवालामध्ये पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व मित्र संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची भेट घेवून केली. यावेळी मूर्ती घडविणाऱ्या कुंभार समाजावर कोणताही अन्याय होवू देणार नाही. येत्या काही दिवसात प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी हटविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करू, अशी ग्वाही दिली.
या संदर्भात मीही वेळोवेळी सभागृहात मुद्दा उपस्थित केला आहे. शिवसेना नेहमीच कुंभार बांधवांच्या पाठीशी ठाम उभी राहिली असून, हा प्रश्न कायमचा सुटण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील असणार आहे. पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा या दृष्टीने लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेवून राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्याबाबत आग्रही भूमिका घेणार असल्याचेही सांगितले.
यावेळी कुंभार समाजाच्या शिष्ठमंडळामध्ये महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेचे सचिव प्रवीण बावधनकर, हेमंत कुलकर्णी, मनोज कुंभार, आप्पा मसवडकर, शिवसेना उपशहरप्रमुख अभिजित कुंभार, कोल्हापूर जिल्हा मूर्तिकार संघटना अध्यक्ष संभाजी माजगावकर,क उपाध्यक्ष अनिल निगवेकर, रवी माजगांवकर, शिवाजी वडणगेकर, प्रथमेश निगवेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply