पश्चिम महाराष्ट्रातील भव्य भीमा कृषी प्रदर्शन २६ ते २९ जानेवारी दरम्यान

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी आयोजित करण्यात येत असलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि भव्य असे भीमा कृषी प्रदर्शन २०२३ येत्या २६ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. मेरी वेदर मैदान येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग असून तीन वेळा नॅशनल चॅम्पियन मिळविणारा जगातील सर्वात मोठा हरियाणातील १२ कोटीचा बादशहा नावाचा रेडा आणि ३१ लिटर दूध देणारी बिजली नावाची म्हैस प्रदर्शनाची खास आकर्षण असणार आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केलेल्या मिलेटचे (तृणधान्य) याचे स्वतंत्र दालन असणार आहे.प्रथम मिलेटिइयरमध्ये ४० स्टॉल असणार आहेत.शिवाय जी.आय मानांकन असणारे पदार्थ पहायला मिळणार आहेत.केळीच्या बुध्दांपासून पदार्थ बनविणारी गुजरात मधील कंपनी रेशीम कोष याची माहिती मिळणार आहे. हायड्रोफोनिक चारा असणार आहे.मोती संवर्धन स्वीट वॉटरचा उपयोग करून अनेक मोती घरात बनविलेले आहेत.हे सर्व कृषी प्रदर्शनात पहावयास मिळणार आहे.अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रदर्शनाचे उदघाटन २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता कोल्हापूरचे पालकमंत्री दिपक केसरकर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.तर २८ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित रहाणार आहेत.

प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.प्रदर्शनामध्ये ४०० स्टॉल आहेत.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने रोज पाच हजार मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.या प्रदर्शनात २७ जानेवारीस कृषी विभागाच्या कृषी विकासात्मक शासकीय योजना या विषयावर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी श्री जालिंदर पांगारे मार्गदर्शन करणार आहेत.तर दुधाळ जनावरांसाठी मुरघास फायदेशीर या विषयावर चितळे डेरी फार्म भिलवडीचे चंद्रशेखर कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत. तर विभागीय संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूरचे डॉ. एम.एम. यादव व डॉ.अस्वले हेदुधाळ जनावरांच्या आरोग्य व वासरू संगोपन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.२८ जानेवारी रोजी पौष्टिक तृणधान्य पिके आहारातील महत्त्व व लागवड तंत्रज्ञान या विषयावर विभागीय संशोधन केंद्र शेंडा पार्क कोल्हापूरचे डॉ. योगेश बन नाचणी पैदासकार हे मार्गदर्शन करणार आहेत. तर भाजीपाला सुधारित लागवड तंत्रज्ञान या विषयावर भाजीपाला पैदासकार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे डॉ.भरत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.निसर्गोपचार केंद्र प्रा.लि. चे स्वागत तोडकर हेही मार्गदर्शन करणार आहेत आणि २९ जानेवारी रोजी जमीन व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय कर्बाचे महत्त्व या विषयावर डॉ. जे. पी.पाटील प्राध्यापक कृषी महाविद्यालय कोल्हापूर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर ऊस विशेषज्ञ मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव ता. फलटण जि. सातारा डॉ. भारत रासकर व सहकारी ऊस वाण व आधुनिक लागवड पद्धती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.ही सर्व व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत.

 

या प्रदर्शनामध्ये पाच महिलांना जिजामाता शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे बक्षीसे दिली जाणार
आहेत.आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ असणार आहेत. तसेच बाजरी नाचणी गूळ विक्रीसाठी असणार आहेत.पाणबोट व्यवस्थापन, पाचट व्यवस्थापन, आणि हायड्रोलिक तसेच चारा तयार कसे केले जाते हेही यावेळी पहावयास मिळणार आहे. तसेच भाजीपाला, ऊस, बी – बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत. प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे,कुत्री, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. ज्यामधून उत्कृष्ट जनावरास पारितोषिक दिले जाणार आहेत. त्याचबरोबर पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे. त्याचबरोबर कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी चालणार आहेत. दुपारच्या सत्रात कृषी तज्ञांची व्याख्याने होणार आहेत. कृषी विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भीमा उद्योग समूहासह खासदार धनंजय महाडिक व हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांनी केले आहे.यावेळी पत्रकार परिषदेला जिल्हा कृषी अधिकारी जालिंदर पांगारे,संग्राम नाईक, सुहास देशपांडे, प्रा. जे.पी.पाटील, डॉ. शिंदे, डॉ.काटकर धनवडे दादा,सुहास देशपांडे, अजित सलगर, स्वागत तोडकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!