
कोल्हापूर/ प्रतिनिधी: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हापुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. महत्वाची गोष्ट म्हणजे महापुराच्या परिस्थितीत कोल्हापूर शहराचा संपर्क तुटू नये, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बास्केट ब्रिज उभारण्यात येणार आहे. नितीन गडकरी यांच्या हस्ते याची पायाभरणी झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या बास्केट ब्रिजमुळे महापूर काळात कोल्हापूरकरांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यास मोठी मदत होईल. शिवाय या पुलामुळे कोल्हापूर शहराच्या सौंदर्यातही भर पडेल, असा विश्वास वाटतो, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या वतीने जिल्ह्याच्या विकासासाठी आजवर आवश्यक त्या सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. पन्हाळा व अन्य आवश्यक ठिकाणी रोप वे व्हावा, असे सांगून यापुढेही केंद्र सरकारच्या वतीने नितीन गडकरी यांनी यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग आंबा ते पैजारवाडी पॅकेज -2) (2191 कोटींचा प्रकल्प- 45.200 किमी) तसेच रत्नागिरी ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 चौपदरीकरण (भाग पैजारवाडी ते चोकाक पॅकेज 3) (2131 कोटींचा प्रकल्प-32.960 किमी) यांचे भूमिपूजन आणि पंचगंगा नदीवरील कोल्हापूर प्रवेशासाठी उड्डाणपूल (बास्केट ब्रिज) (180 कोटींचा प्रकल्प- 1.2 किमी) ची पायाभरणी तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 कोल्हापूर (शिरोली) ते सांगली (अंकली) या विभागाचे चौपदरीकरण (840 कोटींचा प्रकल्प- 33.825 किमी) कामाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार सर्वश्री धनंजय महाडिक, संजय मंडलिक, धैर्यशील माने, संजय पाटील, आमदार सर्वश्री प्रकाश आवाडे, पी.एन.पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे प्रकल्प संचालक वसंत पंधारकर, व्यवस्थापक गोविंदप्रसाद बैरवा, माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply