
कोल्हापूर: पंचमहाभूतांच्या संरक्षणाचा संदेश देणारी संस्कृती आणि विविधतेतील एकता ही देशाची ताकद असून आपल्या संस्कृतीचे रक्षण करा, असे आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी केले.कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ निमित्त परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्वामी शंकरारुढजी महाराज, कर्नाटकच्या धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील, यू.ए.एस. धारवाडचे डॉ.आर.आर. हंचिनाल, गोव्याच्या आयसीएआर चे संचालक डॉ. प्रवीणकुमार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. जगन्नाथ दीक्षित, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे धीरज कांकरे, जम्मू काश्मीर चे मसुरी इकबाल प्रमुख उपस्थित होते, तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार आनंदराव पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यपाल आरिफ खान म्हणाले, मानवाचे अस्तित्व टिकण्यासाठी पंचमहाभूतांचे संरक्षण आवश्यक आहे. दुसऱ्याला ईजा किंवा हानी पोहोचेल अशी कृती करु नये, हा संदेश आपल्याला आपल्या देशाच्या संस्कृतीने दिला आहे. ही संस्कृती भव्यदिव्य असून तिच आपली संपत्ती आहे. निसर्गाची शक्ती मोठी असून या निसर्गाचे, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश भारत देशाने जगाला दिला आहे. कणेरी मठ येथील जनकल्याणासाठीचे व पर्यावरण रक्षणासाठीचे कार्य महत्वपूर्ण असून या लोकोत्सवाच्या माध्यमातून नवी चेतना, नवा आयाम मिळेल, असा विश्वास राज्यपाल श्री. खान यांनी व्यक्त केला.
Leave a Reply