
कोल्हापूर :समरजित घाटगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, त्यांचा शाहू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हा दूध संघ याबद्दल काही विधाने केलेली आहेत. ही विधाने अतिशय दिशाभूल करणारी आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवणारी आहेत. मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यात मला अडकवून टाकण्याच्या इराद्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट होतो. मी गेली ३५-४० वर्षे सार्वजनिक जीवनात कार्यरत आहे. गोरगरीब जनतेचे प्रेम आणि विश्वासार्हता मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेले आहे. ३५-४० वर्ष रक्त आठवून ही विश्वासार्हता मिळविलेली आहे. कुणी काहीही आरोप करून, खोटे गुन्हे दाखल करून ती जाणार नाही.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करीत असताना यापूर्वी आम्ही अनेकवेळा उल्लेख केलेला आहे की, आम्हाला सहकारी साखर कारखानाच उभा करायचा होता. परंतु; त्यावेळी शासनाने सहकारी साखर कारखानदारीला बंदी घातली होती, नोंदणी बंद केली होती. तसेच, एकास नऊ या प्रमाणात द्यावयाचे शासकीय भागभांडवल देण्याचे नाही, असे ठरविले. शासकीय थकहमी न देण्याचाही निर्णय सरकारने घेतल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला खाजगी तत्वावरील हा साखर कारखाना उभारावा लागला. त्याबद्दल यापूर्वी मी सातत्याने सांगितले आहे की, ४० हजार लोकांचे पैसे आणि पाच राष्ट्रीयकृत बँकांची कर्जे, असे पैसे उभा करून माझ्या मुलांनी हा साखर कारखाना उभा केलेला आहे. अवघ्या काही दिवसातच ४० हजार शेतकरी ४० कोटी रुपये साखर कारखान्याच्या उभारणीसाठी देऊ शकतात, यावरून आमची विश्वासार्हता किती आहे, हे स्पष्ट होते. वास्तविक; समरजीत घाटगे यांनी हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.
त्यांना आठवत असेल, ज्यावेळी त्यांचे वडील स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हा दूध संघ काढायचा आणि समरजीत घाटगेना चेअरमन करावयाचे ठरविले. त्यावेळी पहिल्यांदा एक हजार रुपयांचा शेअर्स आणि त्याप्रमाणे पावत्या दिलेल्या होत्या. त्या पावत्या पुन्हा बदलून त्यांनी पाच हजारांचा शेअर्स केला. पहिल्यांदा केलेला तो शेअर्स का परत घेतला आणि त्याच्या पावत्या का बदलल्या, याचेही कारण त्यांना माहित आहे. याच कारणामुळे आम्हालाही शाहू दूध संघाप्रमाणेच हे पैसे उभे करावे लागले. त्यामुळे, आज समरजीत घाटगे जे विचारत आहेत कि, सभासद कुठे आहेत? जनरल बॉडी कुठे आहे? वार्षिक अहवाल कुठे आहे? या सगळ्याची उत्तरे त्यामध्ये आहेत. ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांना स्पष्टपणे माहीत आहे. दरम्यान; यामध्ये एकच धोका होण्याची शक्यता आहे तो म्हणजे ४० हजार शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा बंद करण्याच्या मनस्थितीमध्ये समरजीत घाटगे आहेत. याला कारणीभूत तेच ठरणार आहेत.
शाहू दूध संघाचा पाच हजार रुपयांचा शेअर्स घेतला, त्या सभासदांना आजअखेर श्रीखंडाचा अर्धा कपही दिलेला नाही. त्या सभासदांची फसवणूक तर त्यांनी केलेलीच आहे. आता हा शाहू दूध संघ त्यांनी चालवायला दिला की विकलेला आहे, हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्या दूध संघाच्या व्हन्नूरच्या माळावरील कार्यस्थळावर जाऊनच पाहून खात्री करून घ्यावी. आता पत्रकारांनी जाऊन स्वतः पहावे की, तिथे शाहू दूध संघाचा बोर्ड जाऊन कोणाचा बोर्ड लागलेला आहे. कोण मॅनेजमेंट करतय. कुणाच्या गाड्या आहेत. कुणाचे युनिफॉर्म घालून ते अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत. तसेच, शाहू दूध संघाची जिल्ह्यातील चिलींग सेंटर इतर दूध संस्थांना, संघाना व कंपन्यांना विकलेत की नाही आणि त्या चिलींग सेंटरवर त्या -त्या कंपन्यांचे बोर्ड लागलेत की नाहीत, हेही पत्रकारांनी पाहून खात्री करून घ्यावी. यावरूनच ते शाहू दूधसंघाच्या सभासदांची फसवणूकच करीत आहेत. याबद्दल ते बोलायलाच तयार नाहीत. म्हणजेच ते अपहार करीत आहेत. दुसरा विषय आर.के.व्ही.वाय. म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे जे त्यांनी अनुदान उचललेले आहे. याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. ठीक आहे, ते नाही बोलू देत. परंतु; योग्य त्या न्यायालयात सभासदच दाद मागतील.
ते सातत्याने ४० हजार सभासदांचा मुद्दा काढीत आहेत. त्यांना माहीत नाही, आजसुद्धा मी हाक दिली तर शंभर कोटी रुपयेसुद्धा ऊभे करायला आमचे शेतकरी आणि कार्यकर्ते एका पावलावर तयार होतील. परंतु; कायद्याने आजमितीला ते करता येत नाही. याची जाणीव त्यांनाही आहे आणि मलाही आहे. त्यामुळे अशा असमंजस माणसाबरोबर जास्त चर्चा करीत बसणे हे अपरिपक्वपनाचे आणि मूर्खपणाचे ठरेल.
४० हजार भाग भांडवलदारांचे पैसे कुठे गेले? कसे फिरवले? याची सगळी माहिती आम्ही आर.ओ.सी.ला, आयकर विभागाला यापूर्वीच दिलेली आहे. ज्या -ज्या यंत्रणा तपास करीत आहेत किंवा करतील त्यांनाही देऊ. याला आम्ही उच्च न्यायालयातून स्थगितीही आणलेली आहे. परंतु; कोणत्याही परिस्थितीत समोरासमोरून लढण्याची हिंमत नाही म्हणून अशा कूटनीतीने मला कुठेतरी अडकवायचं आणि अडचणीत आणण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मला ठाम विश्वास आहे, परमेश्वराच्या कृपा आणि सर्वसामान्य जनता माझे संरक्षण करील.
आणखीन एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो. मी आणि स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे एका विधानसभेला एकत्र होतो. स्वर्गीय कै. विक्रमसिंहराजे घाटगे यांनी मला सहकार्य केले होते. कसबा सांगावचे माजी सरपंच डॉ. तेजपाल शहा यांच्या साक्षीने समरजित घाटगेना मदत केली होती. वास्तविक; हे मी बोलणार नव्हतो. कारण; हा माझा जंटलमन वर्ड होता. परंतु; आता त्यांनी काहीच राखायचं नाही असंच ठरविले असेल, तर हेसुद्धा मला बोलावच लागेल. या पुढील काळात अशाच प्रकारचा संघर्ष होण्याची चिन्हे मला दिसत आहेत.
साखर कारखाना गेली दहा वर्षे अत्यंत यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. कदाचित, यामुळेच काहींच्या पोटात दुखत असेल. आजपर्यंत ४० हजार शेतकरी तसेच आत्ता तक्रार केलेल्या १३ -१४ शेतकऱ्यांपैकी कुणीही साधी तक्रारसुद्धा केलेली नाही. तक्रार करणारे हे जे १३-१४ लोक आहेत, ते त्यांच्या कारखान्याचे कामगार आणि संचालकही आहेत. आज सकाळपासून फोनवरून मी त्यांच्याशी बोलत आहे. मी त्यांना विचारले की, मी तुमचं काय चुकीचे किंवा नुकसान केले आहे. तुम्ही साखर घेत आहात, सगळ्या सुविधा घेत आहात. अशा पद्धतीने कुणाचे तरी ऐकून, कोणाला तरी पुढे करून जे गलिच्छ राजकारण करीत आहेत. त्याचा मी जाहीर निषेध करतो. जनतेनेही कशा पद्धतीने घाणेरडे राजकारण सुरू आहे, हे समजून घ्यावे.
शाहू साखर कारखान्याच्या कर्जाची माहिती विचारण्याचा मला काय अधिकार आहे, असा प्रश्न ते करीत आहेत. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो, शाहू साखर कारखान्याच्या संस्थापक संचालक मंडळातील मी संचालक आहे. आजही मी त्या साखर कारखान्याचा सभासद आहे. समरजीत घाडगे यांचा त्यावेळी जन्मसुद्धा झालेला नव्हता. त्यावेळी गावोगावी आणि दारोदारी फिरून शाहू साखर कारखान्यासाठी आम्ही शेअर्स गोळा केले आहेत.
वास्तविक समाजकारण आणि राजकारणामध्ये जनतेची सेवा करून, विकासकामे करून, विधायक गोष्टी निर्माण करून मोठं होता येतं. परंतु; ते व्हीलनची भूमिका बजावत आहे. अशापद्धतीने लोकांनाही आवडत नाही.
Leave a Reply