
कोल्हापूर : चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोल्हापूरसाठी भरीव निधीची तरतूद केली नसल्याने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी कपात सूचनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. या कपात सूचना नगरविकास विभागाने स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. यामुळे भविष्यात कोल्हापूरसाठी भरीव निधी मिळेल असा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.कोल्हापूरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी छ्त्रपती शाहू महाराजांचे स्मारक करण्याची घोषणा तत्कालीन राज्य सरकारने केली होती. त्यानुसार शाहू मिल विकास आराखडासाठी महानगरपालिकेने सुमारे चारशे कोटीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देऊन त्वरित निधी द्यावा. आई अंबाबाई मंदिर परिसरात मूलभूत सोयी सुविधा साठी 79.96 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र आराखड्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मात्र, याबाबतचा निधी मिळालेला नाही, तरी तो निधी त्वरित मिळावा. कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या आसपासचे गांवाकरीता तसेच शहराजवळील दोन औद्योगिक वसाहतींकरीता महानगरपालिका अग्निशमन दल अग्निसुरक्षिततेची फार मोठी जबाबदारी २४ तास सांभाळीत आहे. अग्निशामक दलाकडे शहरातील निरनिराळ्या भांगामध्ये सहा स्थानके आहेत. या स्थानक इमारतीस मोडकळीत आले असून, नवीन अग्निशमन वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे अग्निशमन दलाला विशेष निधी मिळावा अशी मागणी केली आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचे सुशोभीकरण व संवर्धन करण्यासाठी निधी मिळावा. महानगरपालिका हद्दीतील अनुसूचित जाती जमाती बहुल क्षेत्राचा विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून निधी मिळावा अशी मागणी प्रलंबित आहे. त्यास मंजुरी देऊन, त्वरित निधी मिळावा. कोल्हापूर शहरातील प्राथमिक सोयी सुविधांसाठी सुमारे दहा कोटी 90 लाख रुपये मागणीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्यास मान्यता देऊन त्वरित निधी मिळावा. तसेच पंचगंगा स्मशानभूमी येथे प्राथमिक सोयी सुविधां उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्मशानभूमीचे दुरुस्ती व नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या प्रस्तावास मान्यता देऊन त्वरित निधी मिळावा. तसेच गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी 19 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्यास ही तातडीने मंजुरी देऊन निधी मिळावा अशी मागणी कपात सूचनेच्या माध्यमातून केली आहे.आमदार जाधव यांनी सादर केलेल्या कपात सूचना नगरविकास विभागाने स्वीकारल्याचे पत्र दिले आहे. तसेच त्याबाबतची माहिती विधिमंडळाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर करांच्या विकास कामास भरघोस निधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
—
Leave a Reply