
कोल्हापूर: जोतिबा यात्रेनिमित्ताने जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी सहज सेवा ट्रस्टचे गायमुखावर २ ते ६ एप्रिल दरम्यान अन्नछत्र आयोजीत करण्यात आले आहे.
महाराष्ट्रामध्ये देव देवतांच्या दरवर्षी ज्या यात्रा भरतात त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात प्रमुख व मोठी यात्रा असते ती वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवाची चैत्र यात्रा. चैत्रामध्ये होणारी ही यात्रा प्रमुख मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून सात ते आठ लाख यात्रेकरू मोठया उत्साहाने सहभागी होतात. या यात्रेसाठी आपापल्या भागातून सासनकाठ्या घेऊन यायची परंपरा आहे. परंपरेप्रमाणे आजही अनेक मानाच्या काठ्या घेऊन शेकडो मैल पायी चालत चांगभलचा गजर करत भक्तगन जोतिबा डोंगरावर येतात. आजच्या आधुनिक काळातही आपल्या गावातून, आपल्या परिवारासह बैलगाडीतून, डोंगरावर येणारे भावीकही आहेत. अशा अनेक पंरपरा या यात्रेमध्ये अजूनही सांभाळल्या जातात. लाखोंच्या संख्येने यात्रेसाठी येणाऱ्या जोतिबा भक्तांच्या सेवेसाठी कोल्हापूरच्या सहज सेवा ट्रस्ट या सेवाभावी संस्थेतर्फे गेली २२ वर्षे सातत्याने जोतिबा डोंगरावरील गायमुख या परिसरामध्ये अन्नछत्र चालविण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही हे अन्नछत्र दिनांक २ ते ६ एप्रिल या कालावधीमध्ये दिवस रात्र सुरू राहणार आहे. मागील वर्षी झालेली गर्दी लक्षात घेवुन यावर्षी दोन लाखाच्या वर यात्रेकरू या अन्नछत्रास भेट देतील. या अंदाजाने अन्नछत्राची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
अशी माहिती अध्यक्ष सन्मती मिरजे आणि चिंतन शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यात्रेकरिता डोंगरावर प्रमुख दोन मार्गाने काणत्या ना कोणत्या वहानाने यात्रेकरू येतात. त्याचबरोबर कुशिरे ते गायमुखामागे जोतिबा डोंगरावर चालत येण्याचा हा पारंपारिक मार्ग आजही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मार्गावरून बहुसंख्य यात्रेकरू व सासनकाठ्या डोंगरावर येतात. यात्रेकरू मुख्य रस्त्याने गायमुखवर येतात. यांच्या वाहनांसाठी गायमुख परिसरामध्ये वाहनतळ तयार करण्यात आला आहे. येथे लाईटची व्यवस्था ही करण्यात आली आहे. आपआपल्या गावातून येणारे भाविक कधी ही रात्री अपरात्री डोंगरावर पोहोचत असतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये या हेतूने त्यांच्या सोयीकरिता सहज सेवाचे अन्नछत्र २४ तास सुरू असते. यात्रा काळात चार दिसव यात्रा नियोजनबद्ध व्हावी याकरिता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभाग, पोलीस दल, होमगार्ड, वन विभाग, बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, परिवहन विभाग, विद्युत विभाग, त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक यांना पोटभर जेवण मिळावे याकरिता सहज सेवा ट्रस्ट तर्फे जेवण देण्यात येते. ते पॅकेटद्वारे या विभागातील सर्वाना पोचवण्याचे काम पोलीस दल व पश्चिम महराष्ट्र देवस्थान समिती करते. अन्नछत्रामध्ये यात्रेकरूंना जेवणासाठी १०८ बाय १३८ म्हणजेच १५ हजार चौरस फुटाचा असा मोठा मंडप उभारण्यात आला आहे. त्याचबरोबर चहा व मठ्ठा करिता वेगळा मंडप उभारण्यात आले आहे. तसेच ज्या दानशूर व्यक्तींना या उपक्रमास मदत करायची आहे त्यांनी सहज सेवा ट्रस्टच्या बसंत बहार रोड वरील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस मनिष पटेल, चेतन परमार, रोहीत गायकवाड, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
Leave a Reply