
कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नामुळे सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून कोल्हापूर शहरातील विकासकामांसाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांकडून विविध विकासकामांचे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी महापालिकेला दिल्या आहेत.राज्य सरकारच्या ‘निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान’ या धोरणानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे गतीने पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार प्रशासन गतिमान करण्यात येत आहे. तसेच निधीअभावी कामे रखडली जाऊ नयेत यासाठी आवश्यक ते प्रस्ताव त्वरित देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर शहरासाठी 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
मंजूर निधीपैकी नागरी दलितोत्तर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 9 कोटी 50 लाख रुपये, पुनर्नियोजनातून 3 कोटी 50 लाख रुपये, असे 13 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर कामे दलितोत्तर वस्ती सुधारणा योजनेतून होत नसतील तर नगरोत्थान योजनेतून प्रस्तावित करावीत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नगरोत्थान योजनेअंतर्गत 16 कोटी 57 लाख, 50 हजार रुपयांची कामे प्रस्तावित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यातील 3 कोटी 82 लाख 50 हजारांचा हिस्सा महापालिकेला भरावा लागणार आहे. नगरोत्थान योजनेअंतर्गत प्रस्तावित करावयाच्या कामांमध्ये पंचगंगा घाट विकास आणि संवर्धन 2 कोटी 50 लाख, पंचगंगा घाट आकर्षक विद्युत रोषणाई 3 कोटी 50 लाख, सार्वजनिक स्वच्छतागृह 2 कोटी, रंकाळा तलाव परिसर आकर्षक विद्युत रोषणाई 3 कोटी 31 लाख, रंकाळा तलाव मिनीएचर पार्क 3 कोटी 57 लाख, हेरिटेज स्ट्रीट विद्युत रोषणाई कामे 1 कोटी 50 लाख अशी 16 कोटी 31 लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.याशिवाय महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत आणखी 4 कोटी 50 लाख रुपयांची कामे प्रस्तावित असून यामध्ये सासणे मैदान वॉकिंग ट्रॅक व विद्युत व्यवस्था – 70 लाख, गंगावेश दूध कट्टा विकसित करणे – 20 लाख, मिरजकर तिकटी दूध कट्टा विकसित करणे – 20 लाख, रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोड फुटबॉल स्ट्रीट विकसित करणे – 50 लाख, डफळे कंपाऊंड ते डेस्टिनी स्टेशनर्स रस्ता – 5 लाख, हुतात्मा उद्यान विकास – 45 लाख, पंचगंगा स्मशानभूमी विकसित करणे – 2 कोटी 30 लाख रुपये या कामांचा समावेश आहे.
Leave a Reply