पायाखालची वाळू सरकल्यामुळेच विद्यमान चेअरमन यांच्याकडून धांदांत खोटे आरोप : माजी नगरसेवक संदीप नेजदार यांचा पलटवार

 

कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावर काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी कोणालाही दमदाटी किंवा धक्काबुक्की केलेली नाही. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच विद्यमान चेअरमन दिलीप पाटील यांच्याकडून आरोप केले जात आहेत असा पलटवार माजी नगरसेवक डॉ संदीप नेजदार यांनी केला आहे. याबाबत पोलिस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचेही नेजदार यांनी म्हटले आहे.

चेअरमन दिलीप पाटील यांनी आरोप केला आहे की अंधाराचा फायदा घेत विरोधकांनी राजाराम कारखान्यात चोरासारखे घुसण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा आरोप तथ्यहीन असून सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच असे आरोप केले जात आहेत असे नेजदार यांनी म्हटले आहे.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या चालू असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये छाननीच्या वेळी आदल्या दिवशी कारखाना प्रशासनाने रात्रभर जागून खोटी कागदपत्रे तयार करून आमच्या आघाडीच्या तगड्या उमेदवारांचे अर्ज छाननीतून बाद करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती नजदार यांनी दिली आहे. नेजदार पुढे म्हणाले की त्यामुळे आम्ही रीतसर प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे अपील दाखल केले. या अपीलावर मंगळवार दिनांक 4 एप्रिल रोजी सुनावणी झाली. त्यावेळेला आमच्या वकिलांनी पुन्हा नवीन आणि भक्कम असे मुद्दे आणि पुरावे सादर केले. पुरावे इतके भक्कम आहेत की आमच्या उमेदवारांचे अर्ज पात्र करणे साखर सहसंचालकांना भाग पडले असते. आणि सत्ताधाऱ्यांचा डाव उधळला गेला असता. म्हणूनच आमच्या उमेदवारांचे अर्ज पात्र होऊ नयेत यासाठी कारखान्याने काल रात्री बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न चालवला असल्याची माहिती आमच्या कार्यकर्त्यांना मिळाली. याची खात्री करण्यासाठी आम्ही प्रमुख कार्यकर्त्यासह कारखाना कार्यस्थळावर गेलो. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सुद्धा उपलब्ध आहे. त्यावेळी कुणालाही धक्काबुक्की केली नाही. असे असताना चेअरमन हे धंदांत खोटे बोलत आहेत असे नेजदार यांनी म्हटले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक बलकवडे यांना निवेदन देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!