नागाव : महाडिक संचालकांना ज्या पद्धतीची वागणूक देतात ते पाहिल्यावर गावातील एखाद्या संस्थेत संचालक होणे चांगले, मात्र महाडिक यांच्या संस्थेत चेअरमनपद नको अशी उपरोधिक टीका राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केली. परिवर्तन आघाडीच्या वतीने नागाव येथे झालेल्या सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. सतेज पाटील, आ. राजूबाबा आवळे उपस्थित होते.सर्जेराव माने पुढे म्हणाले, चेअरमन कोणीही असुदे, महाडिक सर्व अधिकार स्वत:कडेच ठेवतात. एखादा संचालक जरी कारखान्यावर आला तर इकडे का आला? गावात काही काम नाही का? अशा शब्दात अपमानित करत होते. कारखान्यात महाडीक बाप-लेक चेअरमनच्या केबिनमध्ये बसतात आणि चेअरमनला मात्र घुशींनी पोखरलेल्या खोलीत बसवायचे अशी अवस्था आहे.माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण म्हणाले, स्वत:च्या संस्था नीट चालवू न शकणाऱ्या शौमीका महाडिक यांनी सहकारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. विद्यार्थीच येत नसल्याने महाडीकांच्या नावाचे हायस्कूल बंद करण्याची वेळ त्यांच्यावर आली. स्वत:च्या संस्था बंद पडल्यानेच दुसऱ्यानी काढलेल्या संस्थेत घुसखोरी करण्यात महाडीक पटाईत आहेत.वारणा दूध संघाचे माजी संचालक महावीर पाटील म्हणाले, सभासदानी सुवर्णकाळ अनुभवलेल्या या कारखान्याला महाडीकांच्या कारभारामुळे अवकळा आली आहे. सभासदंचा सन्मान ठेवण्यासाठी परिवर्तनला साथ द्या.आ. सतेज पाटील म्हणाले, राजारामचा कारखाना सभासद मालकीचा रहायचा असेल, कारखान्याचा सातबारा महाडिक यांच्या नावावर होऊ द्यायचे नसेल तर या निवडणुकीत परिवर्तन घडवा.यावेळी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, शशिकांत खवरे, बाजीराव पाटील डॉ. गुंडा सावंत, सुधीर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच विमल शिंदे, सुधीर पाटील, दीपक लंबे, विलास चव्हाण, सुरज लंबे, अशोक मगदूम यांच्यासह सभासद उपस्थित होते.
Leave a Reply