
कोल्हापूर: राजाराम साखर कारखाना सभासदांसाठी सहकाराचे मंदिर आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर अमल महाडीकाना श्रमाची आठवण झाली आहे. मात्र त्यांच्या वडिलांनी सत्तेत असताना याच मंदिरातील देवही चोरून बेडकिहाळला नेले, असा घणाघात कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांनी केला. शिरोली दुमाला येथे झालेल्या हिरवडे पंचक्रोशीतील सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्जेराव माने पुढे म्हणाले, महाडीकाच्या कारभारामुळे राजाराम कारखान्याची दुरावस्था झाली आहे. कारखान्यात फिरणेही मुश्कील झाले आहे. यामुळे राजाराम महाराजांच्या काळातील पत्रे उडून गेले आहेत तर अनेक ठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे कारखान्यातील साखर भिजते. कारखान्याची अशी अवस्था असताना निवडणुकीच्या तोंडावर सताधाऱ्याना आता सभासदांची आठवण झाली आहे. राजाराम कारखान्याचा महाडिक पिता-पुत्र फार्म हाउस सारखा वापर करत आहेत. सहकाराच्या या मंदिराची वाताहत करणाऱ्या महाडीकांना सभासदच त्यांची जागा दाखवतील.गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील म्हणाले, शिरोली, आरळे ,घानवडे, हिरवडे पंचक्रोशीतील सभासदानी या निवडणुकीत परिवर्तन आघाडीच्या पाठीशी राहायचे ठरवले आहे. त्यामुळे राजाराम साखर कारखान्यात परिवर्तन होणारच.आमदार सतेज पाटील म्हणाले, सहकारी चळवळ ही जिल्ह्याची अर्थवाहिनी असून ती टिकली पाहिजे. सहकारी चळवळ टिकली तरच संस्था टिकतील आणि संस्था टिकल्या तरच ग्रामीण भागतील अर्थव्यवस्था सुरळीत चालेल. म्हणूनच राजाराम सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा यासाठी आपण सभासदांच्या जीवावर संघर्ष करत आहोत. यावेळी सभासद नक्कीच परिवर्तन घडवतील.यावेळी माजी पं. स. सदस्य सुनील पाटील, राहुल पाटील, माजी सरपंच नंदकुमार पाटील, एस के पाटील, वीरशैव बँकेचे संचालक अनिल सोलापुरे, सचिन पाटील, चांदेचे माजी सरपंच विलास पाटील, जानबा देसाई, संभाजी देसाई, प्रताप कदम, रंगराव पाडळकर, रंगराव कांबळे, पांडुरंग दिंडे, यशवंत देवबा पाटील, अशोक साळोखे यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते.
Leave a Reply