
कोल्हापूर:महाडिकांनी गेल्या 28 वर्षात राजाराम साखर कारखान्यात सभासदांच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. उलट कारखान्यातील चांगली मशिनरी बेडकीहाळला नेली. राजाराम कारखान्याचा वापर करून बेडकिहाळला स्वत:चा खासगी कारखाना उभारला, असा आरोप कॉंग्रेसचे पन्हाळ तालुका अध्यक्ष व कारखान्याचे ज्येष्ठ सभासद जयसिंगराव हिर्डेकर यांनी केला. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्यावतीने बाजार भोगाव, कसबा ठाणे, यवलुजमधील सभासद संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
जयसिंगराव हिर्डेकर पुढे म्हणाले, महाडिकांनी कारखान्यात चेअरमनपद नावापुरतेच ठेवले आहे. ‘हम करे सो कायदा’ अशा पद्धतीने महाडिकांनी कारभार केला. 28 वर्षात कारखान्याचे साधे पत्रेही बदलले नाहीत. सत्ताकाळात महाडिकांनी कारखान्याची धुळदाण केली. दोनशे रुपये कमी दर देऊन त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. या कारखान्यात आता परिवर्तन घडले नाही तर हा कारखाना खासगी होण्याची भीती आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, राजाराम कारखान्याच्या सभासदांच्या मनात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड राग असून तो या निवडणुकीत मतदानातून दिसून येईल. ही निवडणूक म्हणजे परिवर्तनाची मोठी लाट आहे. राजाराम कारखान्यातील सभासदांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे. हा कारखाना सभासदांच्या मालकीचा असून तो सहकारीच रहावा यासाठीचा हा लढा आहे. परिवर्तन हा सर्वांच्या मनातील समान धागा बनला आहे. त्यामुळे यावेळी सभासद कंडका पाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
यावेळी गोकुळ संचालक बाबासाहेब चौगले, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत तेली, राजू साबळे, बाजार भोगावचे माजी सरपंच गणपतराव पाटील, बाळासो मोहिते, हरिश्चंद्र हिरडेकर, कसबा ठाण्याचे सरपंच अनिष पाटील, काशिनाथ पाटील, शहाजी गुरव, सुरेश मेडशिंगे, यवलूजचे जयसिंग पाटील, वसंत बोरे, पांडुरंग काशीद, अंबाजी पाटील, विठ्ठल पाटील, बाबासाहेब आडनाईक दतात्रय पाटील, पप्पू परिट यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
बाजार भोगाव- येथील सभासद संवाद कार्यक्रमात बोलताना जयसिंगराव हिर्डेकर. सोबत आमदार ऋतुराज पाटील.
Leave a Reply