राजाराम हे सहकारचे मंदिर टिकविण्यासाठी माझी लढाई : आम.सतेज पाटील

 

वडणगे: सहकारी साखर कारखाना सभासदांसाठी मदिराप्रमाणे असते. या साखर कारखान्यावर हजारो शेतकरी सभासदांचे संसार उभे असतात. मात्र गेली २८ वर्षे राजाराम कारखान्यात सुरु असलेला कारभार उघड्या डोळ्यांनी बघवत नाही. म्हणूनच सहकाराचे हे मंदिर टिकविण्यासाठी माझी लढाई सुरु असून या लढाईत साथ द्या, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. करवीर तालुक्यातील वडणगे येथे राजर्षी छञपती शाहु परिवर्तन आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.आमदार सतेज पाटील पुढे म्हणाले, 2005 आणि 2014 च्या निवडणुकीमध्ये केलेली मदत महाडीक विसरले आहेत. केलेले उपकार विसरणे हीच महाडिकांची संस्कृती आहे. आमदार पी. एन. पाटील आणि आपण नसतो तर महाडिक कुठे असते याचा त्यांनी विचार करावा. राजाराम कारखान्याची ही निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा महाडीकांचा प्रयत्न आहे. बिंदू चौकात डॉ. आंबेडकर जयंती निमित्त हजारो अनुयायी असताना काही विपरीत घटना घडली असती तर माझ्यावर ठपका आला असता, म्हणूनच मी संयमाची भुमिका घेतली.

खासदारांच्या भीमा कारखान्यावर 587 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी आम्हाला सहकार कसा चालवायचा हे शिकवू नये. 2019 च्या निवडणुकीत पावणेतीन लाख मतांनी पराभूत करून तुम्हाला तुमची जागा जनतेने दाखवून दिली आहे. जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याच्या चेअरमनचा खर्च दोन कोटी रुपये आहे याची नावे जाहीर करावीत, असे आव्हान आमदार पाटील यांनी दिले.
कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, महाडीकानी २८ वर्षे राजाराम कारखाना अक्षरश: लुटला आहे. त्यांच्या हुकुमशाही कारभारापासून कारखाना वाचवण्यासाठी परिवर्तन आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे राहा.
रवी पाटील म्हणाले, महाडीक हे बावड्याच्या पाटलाना भ्याले हे माहित होते. पण आता आमच्या गावातील बी. आर. पाटील यांचा अर्ज छाननीत विनाकारण बाद केल्याने ते वडणगेच्या पाटलाना सुद्धा घाबरल्याचे सिद्ध झाले आहे.
बी.एच पाटील यांनी राजारामच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करुन जाणूनबुजून २९ जणांचे अर्ज अपात्र केल्याचा आरोप केला. या निवडणुकीत ग्राम विकास आघाडी भक्कमपणे परिवर्तन पॅनलच्या सोबत असून निवडणुकीत नक्की परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सचिन चौगले, बी. आर. पाटील, उदयानी साळुखे, बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला हरीश चौगले, शशिकांत खवरे, महेश चव्हाण, शुभांगी पोवार, वाय. के चौगले, बाबासो चौगले, पांडुरंग पाटील यांच्यासह शेतकरी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!