
कोल्हापूर: जागतिक आरोग्य संघटनेकडुन दि. ३१ मे हा दिवस सर्वत्र जागतिक ”तंबाखू विरोधी दिवस” म्हणून साजरा केला जातो.या निमित्त कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तंबाखू सेवना विरोधी बुधवारी सायंकाळी शहरातून जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी कॅन्सरला आमंत्रण देणा-या आणि शरीराला हानिकारक असलेल्या तंबाखूसह सर्वच व्यसनांपासुन दुर रहा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले. दरम्यान तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या अशा प्रबोधनाच्या उपक्रमात रोटरी क्लब नेहमीच तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सहभागी होणार असल्याची ग्वाही रोटरीचे इलेक्ट गव्हर्नर नासीर बोरसादवाला यांनी यावेळी दिली.
“तंबाखू ला हद्दपार करूया,जीवन सुकर करुया”, “तंबाखू सोडा..कॅन्सर टाळा” अशा घोषणा देत आणि हातात फलक घेऊन, ऐतिहासिक दसरा चौक येथून या पदयात्रेस सुरुवात झाली.हलगी कैचाळाच्या ठेक्यात, यमाची वेषभुषा केलेल्या व्यक्तींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बिंदु चौक, छ.शिवाजी महाराज चौक,सीपीआर चौक आदी शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती करत आलेल्या या रॅलीची सांगता, दसरा चौक येथे करण्यात आली.दरम्यान आज तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ क्षणिक आनंद आणि जीवनशैली म्हणून एक मानवी व्यसन बनले आहे.त्यापासून दुर राहिल्यास जीवन अधिक सुखकर जगता येईल असे शाहू कॅन्सर रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त डॉ संदीप पाटील म्हणाले.तर तंबाखू सेवनात पुरुषांच्या बरोबरीने महिलांची सुद्धा तितकीच संख्या असुन, कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाला आपल्या जीवनातून हद्दपार करण्यासाठी सर्वांनी दृढ निश्चय करूया असे आवाहन याप्रसंगी कॅन्सर तज्ञ व कोल्हापूर कॅन्सर सेन्टरच्या संचालिका डॉ.रेश्मा पवार यांनी केले.
कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर, कॅन्सरतज्ञ डॉ.सुरज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ.योगेश अनाप,डॉ.पराग वाटवे,डॉ. किरण बागुल,डॉ.निलेश धामणे, करवीर रोटरीचे प्रेसिडेंट उदय पाटील यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply