आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजला विजेतेपद

 

कोल्हापूर:डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत डी वाय पाटील मेडिकल कॉलेजने सर्वसाधारण विजेतेपद मिळवले आहे. संस्थेचे विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्याना चषक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कोणतीही स्पर्धा म्हटली की जय- पराजय हा आलाच. मात्र, विजयापेक्षा स्पर्धेतील सहभाग हा महत्त्वाचा असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील स्पर्धात्मक गुण वाढतात. विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन बौद्धिक निर्णय घेण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पृथ्वीराज पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात केले.कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा मांडला. कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल म्हणाले, क्रीडा स्पर्धांमुळे तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्याचबरोबर विद्यार्थी शारीरिक मानसिकदुष्ट्या सक्षम बनतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण लोकांसमोर खेळत असल्याने गैरप्रकारापासून लांब राहतो. त्यामुळे सर्वांगीण प्रगतीसाठी खेळ अत्यावश्यक आहेत.डी वाय पाटील विद्यापीठाच्यावतीने ६ एप्रिल पासून आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाला. यामध्ये विद्यापीठांतर्गतच्या सात संस्थातील ४५७ खेळाडूनी सहभाग घेतला. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बुद्धिबळ, बॅडमिंटन व ॲथलेटिक्स खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट, बास्केटबॉल व फुटबॉल या तिन्ही सांघिक प्रकारात डी वाय पाटील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा संघ विजेता ठरला. महिला बास्केटबॉलमध्येही मेडिकल कॉलेजच्या संघाने विजय मिळवला.मेडिकल कॉलेजची मृण्मयी अनिरुद्ध तगारे उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून तर नर्सिंग कॉलेजचा अधिशेष खारखर याची उत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. सर्वसाधारण विजेतेपद मिळवणाऱ्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्यावतीने उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील आणि सर्व खेळाडूंनी विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांच्या हस्ते अजिंक्य पदाचा फिरता चषक स्वीकारला. यावेळी विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या खेळाडू व संघांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, क्रीडा संचालक शंकर गोनूगडे यांच्यासह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व विभाग प्रमुख उपस्थित होते. कुलपती डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!