
कोल्हापूर : हुपरी येथील चांदीचे दागिने जगप्रसिद्ध आहेत याच चांदीच्या दागिन्यांना आता जीआय मानांकन मिळाले आहे.जीआय मानांकनामुळे जिल्ह्यातील चांदी हस्तकला उद्योगाला एक वेगळी ओळख मिळाली असून, तो संरक्षित होणार आहे. या दागिन्यांच्या नक्षीकामाची कोणीही कॉपी करू शकणार नाही सर्व हक्क यामुळे सुरक्षित झाले आहेत.या उद्योगाची गती वाढविण्यासाठी कागल-पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सहा महिन्यांत हुपरी सिल्व्हर ऑर्नामेंट क्लस्टर सुरु केले जाणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर नाईक आणि उपाध्यक्ष दिनकरराव ससे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली . हुपरी आणि परिसरामध्ये सुमारे सात हजार चांदी उद्योजक कार्यरत असून २० हजार महिला-पुरुष कारागीर हस्तकला चांदी दागिने बनविण्याचे काम करतात. या हस्तकलेचा गैरफायदा इतर ठिकाणी घेतला जावू नये. ही परंपरागत कलेचा ठेवा जतन व्हावा. त्याठिकाणी होणाऱ्या चांदी दागिन्यांची खासियत कायम रहावी या उद्देशाने चांदी कारखानदार असोसिएशन सन २०१४ पासून येथील उत्पादित चांदी दागिन्यांना जीआय मानांकन प्राप्त व्हावे यासाठी शासनाकडे प्रयत्न केले. त्याला यश मिळाले आहे. पैंजणसह चांदीच्या विविध ३० दागिन्यांच्या नक्षींना आणि वस्तूंना जीआय मानांकन मिळाले आहे असे नाईक यांनी सांगितले. सिल्व्हर ऑनमिंट क्लस्टरच्या सीएफसी सेंटरसाठी कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सिल्व्हर झोनमध्ये पंधरा गुंठे जागा मिळाली आहे. तेथे सहा महिन्यांत सीएफसी सेंटर सुरु करण्यात येईल. दहा कोटी रुपयांची मशिनरी तसेच सामग्री येथे आणण्यात येणार आहे. आणि हुपरी सह परिसरात काम करणाऱ्या सर्व कारागिरांना येथून कच्चामाल पुरवला जाणार आहे. तसेच कारागिरांना पुढची पिढी तयार व्हावी म्हणून प्रशिक्षण देखील इथे दिले जाते. असे यावेळी सांगण्यात आले पत्रकार परिषदेस सचिव संभाजी शिंदे, संचालक नेताजी निकम, सुर्यकांत जाधव, रावसाहेब चौगुले, बबन भोसले, अण्णासो म्हेतर, रामदास म्हतेर उपस्थित होते.
Leave a Reply