कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने आर्किटेक्ट श्री नाईक यांच्या लॅण्डस्केप डिझाईन कार्यशाळेचे आयोजन

 

कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्यावतीने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आर्किटेक्ट श्री नाईक यांच्या
लॅण्डस्केप डिझाईन कार्यशाळेचे आयोजन
कोल्हापूर: श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, कोल्हापूर आणि नॅशनल असोसिएशन ऑफ स्टूडंटस ऑफ आर्किटेक्चर (NASA-INDIA) च्या कोल्हापूर, सांगली, सातारा या झोन-३ चॅप्टरच्या कॉलेज युनिट सेक्रेटरी तर्फे येत्या शुक्रवारी आणि शनिवारी दि.०९ आणि १० ऑगस्ट रोजी कोल्हापूरात विद्यापीठ स्तरावरील कार्यशाळा व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. दिल्ली येथून नामांकित आर्किटेक्ट श्री नाईक हे लॅण्डस्केप डिझाईन या विषयावरती मुलांशी संवाद साधणार आहेत. या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – कसबा बावडा, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – तळसंदे, श्री. एस. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – इस्लामपुर, आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – सांगली, यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – सातारा या पाच आर्किटेक्चर कॉलेजचे असे १५० हुन अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच आर्किटेक्चर क्षेत्रात येण्यास इच्छूक असणाऱ्या बारावी पास विद्यार्थ्यांना पण सहभागी होता येणार आहे. अशी माहिती आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य चिदंबर दुदगीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ही कार्यशाळा कॉन्टेक्टो सॉरस या लॅण्डस्केप आर्किटेक्चरल जागेचे स्थानिक वेगळेपण कसे जपायचे या विषयावर आहे. दि.०९ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता ही उद्घाटन होईल. आणि तीन टप्प्यात पार पडेल. पहिला टप्पा हा “डिझाईन थिंकीग” म्हणजेच डिझाईनच्या पध्दतीच्या मागे एक अद्वितीय विचार समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राफिक्स आणि सर्जनशीलतेचा विचार, डिझाईन एक्सप्रेशनमध्ये कसा करता येईल यावर भर आहे. अखेरच्या तिसऱ्या टप्पयामध्ये डिझाईन ॲप्लीकेशन मध्ये प्रत्यक्ष जागेवर केलेल्या सृजनशील डिझाईनची अंमलबजावणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शन करणारे आणि दिल्ली एनसीआरमध्ये राहणारे आर्कि. श्री नाईक हे प्रॅक्टिसिंग लँण्डस्केप आर्किटेक्ट, तसेच एक उत्कृष्ट कलाकार असून लॅण्डस्केप डिझाइन कन्सल्टन्सी फर्म हेझल अर्थ चे मुख्य डिझायनर आणि संचालक म्हणून कार्यरत आहेत. व्याख्याते आणि शिक्षणतज्ञ म्हणून आर्कि. श्री नाईक जवळपास १० वर्षांपासून वास्तूकलेच्या शैक्षणिक जगासमोर ग्राफिक विचारसरणी उलगडत आहेत. विविध महाविद्यालयांच्या विविध विद्यार्थी संघटनांसाठी विचार आणि प्रक्रियांमध्ये नावीन्यपूर्ण सर्जनशीलता व्यक्त करण्याच्या कल्पनेचा ते सतत पाठपुरावा करत असतात. देशभरातील असंख्य आर्किटेक्चर आणि डिझाईन संस्थासोबत त्यांनी अशा ग्राफिक डिझाईन आणि रेखाचित्र कार्यशाळेत सहभाग घेतला आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दिल्ली एनसीआरमधील लतिमापूर ऑक्सिडेशनलेक आणि रोहिणी तलाव या प्रकल्पावर त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केले आहे. “अर्बन स्केचर्स” दिल्लीचे ते संस्थापक मेंबर आहेत. प्रत्येक शहराचा आत्मा स्केचमधून रेखाटण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसेच ते श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे माजी विद्यार्थी आहेत.
हि कार्यशाळा संस्थेचे चेअरमन के. जी. पाटील यांच्यासह संचालक मंडळाच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या कार्यशाळेचा संयोजनासाठी प्रा. अंजली जाधव, प्रा. वंदना पुसाळकर, प्रा. कवन लोकरे, नंदिनी निकम, निहाल मुलतानी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी कार्यरत आहेत. तरी या कार्यशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य चिदंबर दुदगीकर यांनी केले आहे.पत्रकार परिषदेस प्रा. अंजली जाधव, प्रा. वंदना पुसाळकर, प्रा. मनोरमा पाटिल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!