डॉ.श्रीनिवास पाटील यांना डॉ.डी.वाय.पाटील जीवन गौरव’

 

कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२४-२५ साठीचा “डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” सिक्कीमचे माजी राज्यपाल डॉ. श्रीनिवास दादासाहेब पाटील यांना जाहीर झाला आहे. रविवार दि. १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या १९ व्या स्थापना दिनी कोल्हापुरचे खासदार डॉ. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रामुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली. या समारंभाला डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माजी मंत्री, आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांची उपस्थितीत राहणार आहे.रविवारी विद्यापीठाच्या १९ व्या स्थापना दिनी सकाळी ९.४५ वाजता विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व विद्यापीठ गीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हॉटेल सयाजीच्या व्हीक्टोरिया सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणारे डॉ. श्रीनिवास पाटील हे माजी सनदी अधिकारी आहेत. एम. ए. एलएलबी पर्यंत शिक्षण झालेल्या डॉ. पाटील यांनी राज्य व केंन्द्रीय सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर राजकारणाच्या माध्यमातून जनसेवेला वाहून घेतले. १९६५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे त्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाली. करवीर, हातकणगले, संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी अशा विविध पदांवर काम केल्यानंतर त्यांना १९७९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळाली. त्यांतर बीड व पुणे येथे जिल्हाधिकारी, साखर संचालक पदासह अनेक मोठ्या पदांवर त्यांनी प्रभावी कामगिरी केली.ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आग्रहाखातर प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन डॉ. पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ व २००४ मध्ये कराड लोकसभा मतदार संघातून ते विजयी झाले. २०१३ ते २०१८ या कालावधीत सिक्कीमचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवत तिसऱ्यांदा लोकसभेत प्रवेश केला.कराड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष, ८४ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलानाचे संयोजन समिती सदस्य, बालेवाडी येथील तिसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सह-अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. प्रशासकीय सेवा, समाजसेवा, राजकारण, कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. श्रीनिवास दादासाहेब पाटील यांची विद्यापीठातर्फे यावर्षीच्या डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ. मुदगल व डॉ. भोसले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!